हसत खेळत शिक्षण घेण्यासाठी 33 शाळांमध्ये बालभवन निर्मिती

हसत खेळत शिक्षण घेण्यासाठी 33 शाळांमध्ये बालभवन निर्मिती

डहाणू : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणार्‍या 33 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षणाचे धडे देण्यासाठी बालभवन निर्माण करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता वाढवून शाळेत खेळीमेळीचे वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने उपक्रम राबवण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी 2020 ची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने आदिवासी विकास प्रकल्पामार्फत शाळांमध्ये बालभवन निर्माण करण्याचे काम सुरू आहे. डहाणू प्रकल्प अंतर्गत 33 शाळांमध्ये बालभवन निर्माण करण्यात आले आहे. 35 हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. पारंपरिक अध्यापन पद्धतीने न शिकवता विद्यार्थी केंद्रित पद्धतीने अध्यापन करण्यावर भर देण्यात येत आहे. बालभवन तयार करताना शाळेच्या भिंतींवर, फरशीवर विविध चित्रे आकारून आणि कागदी आकृत्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूच्या प्रकल्प अधिकारी संजिता मोहपात्र यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत असून सहाय्यक प्रकल्प अधिकारी उमेश काशीद, मधुकर जागले, प्रकल्प शिक्षण अधिकारी सुरेश बनसोडे, विस्तार अधिकारी नरेंद्र संखे, अरुण शेट्ये, डी.एम.वडाळ यांच्या सहकार्याने प्रकल्प अंतर्गत शाळांमध्ये उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात येत आहे.

First Published on: May 25, 2023 10:29 PM
Exit mobile version