राष्ट्रीय महामार्गावर क्रेन आणि ईकोचा अपघात

राष्ट्रीय महामार्गावर क्रेन आणि ईकोचा अपघात

डहाणू :  मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यातील वडवली गावच्या हद्दीत सोमवार 19 डिसेंबर रोजी दुपारी 1.20 वा. च्या दरम्यान क्रेन आणि ईको कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये इकोकारमधील चालक कमलेश धूम (रा. उपलाट, तालुका. तलासरी) यांना गंभीर दुखापत झाली असून कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे जीवितहानी टळली आहे. महामार्गाच्या मुख्य वाहिनीवरून उलट दिशेने प्रवास करणार्‍या क्रेनमुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. तलासरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले असून क्रेन चालक फिरोझ खान यांना ताब्यात घेतले आहे.

महामार्गावर गुजरात बाजूकडून मुंबईकडे क्रेन घेऊन निघालेला चालक वडवली हद्दीत झायका हॉटेल समोरील कट (मध्य वळणावरून) आपले वाहन गुजरात वाहिनीवरील पहिल्या मुख्य लेन वरून उलट दिशेने मुंबईकडे घेऊन निघाला होता. दरम्यान एका भरधाव इको कारने क्रेनला समोरासमोर धडक देऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातासाठी क्रेन चालकाला सर्वस्वी जबाबदार ठरवण्यात येत असून, क्रेन चालकाने उलट दिशेने प्रवास करण्याचे कारण काय असावे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. तर ही वाहने सीमा तपासणी नाक्यावरील मुंबई वाहिनी वरील नाक्यावरून जागा नसल्यामुळे उलट दिशेने प्रवास करून तपासणी नाका ओलांडत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीमा तपासणी नाका ओलांडणारी अती अवजड वाहने नेहमीच उलट दिशेने प्रवास करत असल्याचे आरोप केले जात आहेत. सीमा तपासणी नाक्यावर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कार्यरत असताना वाहने सर्रासपणे उलट दिशेने प्रवास करत असल्यामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीमा तपासणी नाक्यावर उलट दिशेने तपासणी नाका ओलांडणारी ही वाहने अती अवजड असून त्यांच्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी ते उलट दिशेने प्रवास करत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

दापचरी सीमा तपासणी नाका येथून नेहमीच अती अवजड वाहने उलट दिशेने तपासणी नाका ओलांडून जात असतात. अशा वाहनांवर वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून कारवाई होत नाही.
– इद्रिस सोलंकी, वाहन चालक

दापचरी सीमा तपासणी नाका येथे महामार्ग पोलीस नेहमीच उभे राहत असून त्यांच्याकडून लहान वाहनांची तपासणी केली जात असते. असे असताना त्यांच्या समोरच अती अवजड वाहने उलट दिशेने प्रवास करत असताना त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे महामार्ग पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे.

First Published on: December 19, 2022 9:49 PM
Exit mobile version