मुंबई- वडोदरा एक्सप्रेस वे च्या कामाने शेतीचे नुकसान

मुंबई- वडोदरा एक्सप्रेस वे च्या कामाने शेतीचे नुकसान

बोईसर : मुंबई ते वडोदरा दरम्यान सुरू असलेल्या एक्सप्रेस वे च्या कामाने पालघरमधील शेतीचे नुकसान झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी धुकटण येथील शेतकर्‍याने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
पालघर तालुक्यातील धुकटण येथे मुंबई वडोदरा एक्सप्रेस वेचा कास्टींग यार्ड उभारण्यात आला आहे. यामध्ये द्रुतगती महामार्गाच्या कामासाठी लागणारे खडी, सिमेंट, स्टीलसारखे साहित्य ठेवण्यात आले असून आर.एम.सी.प्लांट मधील बाहेर पडणारे सिमेंट युक्त सांडपाणी खुलेआम शेजारील स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतीत सोडले जात असल्याने येथील अनेक हेक्टर जमिनीवरील भात पीक हे सध्या पाण्याखाली जाऊन कुजण्यास सुरुवात झाली असल्याची तक्रार शेतकर्‍यांनी प्रशासनाकडे केली आहे.
धुकटन गावातील कृष्णा नारायण वझे या शेतकर्‍याने गेल्या वर्षी जवळपास ४२ क्विंटल भाताचे उत्पादन या शेतीतून घेतले होते. मात्र यावर्षी जीआर इन्फ्रा कंपनीच्या कास्टींग यार्डमधून बाहेर पडणार्‍या सिमेंट युक्त सांडपाण्यामुळे त्यांची पूर्ण शेती नापीक होऊन यावर्षी फक्त ३ ते ४ क्विंटल पीक आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वर्षभर ज्या भात पिकावर या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो तीच पिके शेतात आलेल्या सांडपाण्यामुळे शेताबाहेर काढता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत . या सगळ्याची रीतसर तक्रार करून देखील न्याय मिळत नसल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे .

मुंबई (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) ते वडोदरा एक्सप्रेस वे च्या कामाला पालघर जिल्ह्यात सुरूवात झाली आहे.शिरसाड ते मासवनपर्यंतच्या २८ किमी पॅकेजचे काम जीआर इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले आहे.तर पुढील मासवण ते गंजाड या २८ किमी पॅकेजचे काम माँटे कार्लो ही कंपनी करीत आहे.द्रुतगती महामार्गाचे काम करताना गौणखनिज वाहतूक करणार्‍या जीआर इंफ्रा आणि माँटे कार्लो या ठेकेदार कंपनीच्या अवजड वाहनांमुळे वरई-सफाळे रस्ता, मासवण-नागझरी या मुख्य रस्त्यासोबतच पारगाव, सोनावे,नावझे, गिराळे, साखरे, खामलोली,बहाडोली, धुकटण, काटाळे, लोवरे, निहे, नागझरी, लालोंडे, किराट, बोरशेती, रावते, चिंचारे या आजूबाजूच्या गावातील अंतर्गत रस्त्यांची देखील वाट लागली आहे.

First Published on: November 13, 2022 10:06 PM
Exit mobile version