जिल्ह्यात शौचालयांच्या आडून भ्रष्टाचाराची घाण ?

जिल्ह्यात शौचालयांच्या आडून भ्रष्टाचाराची घाण ?

वसईः पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड व तलासरी या ५ तालुक्यांतील शौचालय घोटाळा गाजत असतानाच डहाणू तालुक्यातही मोठा शौचालय घोटाळा उघडकीस आला आहे. हा घोटाळा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे यांनीच उघडकीस आणल्याने या घोटाळ्याची चर्चा पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे. पंकज कोरे यांनीच या घोटाळ्याचा मुद्दा उचलून धरल्याने अधिकार्‍यांना दोषींवर कारवाई करावीच लागणार आहे. पण, घोटाळ्यात पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारीच गुंतले असल्याने कारवाईबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

डहाणू तालुक्यातील वाणगाव ग्रामपंचायतीमधे शौचालय अनुदान वाटपामधे गैरव्यवहार झाल्याचे चौकशीमध्ये सिद्ध झाले आहे. २१ लाभार्थींनी शौचालये न बांधताच अनुदान लाटले आहे. १९ लाभार्थ्यांच्या घरांना चौकशी अधिकार्‍यांनी भेटी दिल्या असता या १९ लोकांचा ठावठिकाणाच आढळून आला नसल्याने ते सर्व बोगस लाभार्थी असल्याचे दिसून आले आहे. २६ लाभार्थींनी ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा केलेली नसताना त्यांना अनुदान दिले गेले आहे.

शौचालयांचा लाभ अनुसूचित जाती-जमातीच्या अल्पभूधारक, भूमीहीन व गरीब लाभार्थींना द्यायच्या ऐवजी तो श्रीमंताना दिला गेला आहे. एकाच कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींना लाभ दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. अनुदान प्राप्त यादीमधे सरपंच, पंचायत समिती सदस्य, घरपट्टी नसलेले व अठरा वर्षे पूर्ण झालेले नसल्याने लाभार्थी असल्याने अधिकार्‍यांनी संगनमताने अनुदान लाटल्याचे उघड झाले आहे.

शौचालयांचा लाभ देताना जिओ टँनिंग करून आवश्यक कागदपत्रे व शौचालयाचे छायाचित्र संकेत स्थळावर अपलोड करावे लागते. त्यामध्ये हेराफेरी केली गेली आहे. ज्यांच्याकडे दाखला आहे. जे फ्लॅटमधे राहतात त्यांनाही शौचालयाचे बारा हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. त्यामधील लाभार्थी बंगल्यामध्ये व फ्लॅटमध्ये राहत आहेत. या संदर्भात चौकशी अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेकडे सविस्तर अहवाल दिला आहे. मात्र, अद्यापपर्यंत या घोटाळ्यास जबाबदार असणार्‍यांवर कारवाई झालेली नाही.

पालघर जिल्हा परिषदेमध्ये तक्रार केल्यानंतर भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले जातात. अहवाल मागवले जातात. मात्र त्यानंतर सेटलमेंट होऊन अहवाल पडून राहतात. उघडकीस आलेल्या प्रत्येक प्रकरणावर तात्काळ कारवाई झाली तरच असे प्रकार पुन्हा होणार नाहीत. मात्र या भ्रष्टाचारांमध्ये वरीष्ठ अधिकारीच सहभागी असल्याने कुणावरही कारवाई होत नाही.

वाडा तालुक्यात ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचारात गटविकास अधिकारी सहभागी झाल्याने कुठल्याच तक्रारींची दखलही घेतली गेलेली नाही. वाडा तालुक्यातील पालसई या गावामध्ये शौचालये न बांधताच अनुदानाचे पैसे हडप केल्याचे उजेडात आले आहे. ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर चौकशी सुरू झाली. गटविकास अधिकारी राजेंद्र खताळ हे स्वतः गावामध्ये जाऊन पहाणी करून आले. त्यांनाही गावांमध्ये शौचालये दिसली नाहीत. त्यामुळे त्यांनी तात्काळ ग्रामसेवकावर व पंचायत समितीमधील बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांवर खोटी कागदपत्रे रंगवून बोगस बिले काढली म्हणून पोलीस ठाण्योमध्ये गुन्हा नोंदवून कारवाई करायला हवी होती. मात्र, वर्ष उलटून गेले तरीही चौकशी सुरुच असल्याचीच माहिती पंचायत समितीकडून देण्यात येत आहे.

First Published on: March 20, 2023 9:12 PM
Exit mobile version