अन्न, पाणी, वस्त्र, निवारा आणि मोबाईल

अन्न, पाणी, वस्त्र, निवारा आणि मोबाईल

जव्हार : मागील दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शाळेचे वर्ग सुरू होते. यात विद्यार्थ्यांना सर्व अभ्यास हा मोबाईलवर करावा लागत असायचा, येथूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोबाईल वापरायचे ज्ञान प्राप्त झाले. परंत,ु हे ज्ञान एवढे वाढले की, आता येथील विद्यार्थी हे मोबाईलचा अतिवापर करत असल्याने एक प्रकारे मोबाईलचे व्यसन लागले आहे, यामुळे या विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि आहारावरही गंभीर परिणाम झाल्याचे चित्र आहे. सध्या ग्रामीण लहान-मोठे विद्यार्थी मोठ्या संख्येने मोबाईलच्या आहारी गेलेले असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व आहारावर देखील मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षकांबरोबर आता पालक देखील चिंतेत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात शाळा जवळपास दोन वर्षे बंद होत्या. त्यात मुलांचे शैक्षणिक वर्ष बुडू नये तसेच अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होण्यासाठी जवळपास सर्वच शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मुलांना ऑनलाईनच्या माध्यमातून शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केला. त्यात त्या काळात बर्‍याच पालकांना अँड्रॉईड मोबाईल घेण्याची ऐपत नसताना देखील पैसे उपलब्ध करून मोबाईल घेतला खरा पण हाच मोबाईल आता डोकेदुखी ठरत आहे. कारण मुले आता शाळेतून आली की, मोबाईल घेऊन बसत आहेत. त्यात त्यांचे अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, शिवाय यामुळे आहारावर देखील मोठा परिणाम दिसून येत आहे. मुलांचे हट्ट पुरविणे ही वडिलांची जबादारी आहे पण पुरविलेला हट्ट जर डोकेदुखी ठरत असेल तर काय करावे, हा मोठा प्रश्न पालकांना आता सतावू लागला आहे. कारण त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर तसेच अभ्यासावर दिसून येवू लागले आहेत.

करोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर मोबाईलची मुलांना अजिबात गरज नाही. त्यामुळे मोबाईलवर पूर्णतः बंदी घातली पाहिजे. काही पालक मुलांच्या हातात मोबाईल देतात, पण त्याच दुरुपयोग देखील होतो.

– रोशनी जाबर, पालक

सध्याच्या काळात मोबाईल मुलांना गरजेची वस्तू बनला आहे. विद्यार्थी अभ्यास व गृहपाठ हा मोबाईलमध्ये उत्तरे शोधून करीत आहे. त्यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेवर देखील परिणाम होत आहे. मोबाईल काळाची गरज असली तरी त्याचा कितपत वापर करावा हा देखील महत्त्वाचा विषय बनला आहे.

– सूर्या तूंबडा, पालक

First Published on: October 11, 2022 10:11 PM
Exit mobile version