ग्रामसेविका निलंबित; ग्रामस्थांच्या तक्रारीला यश

ग्रामसेविका निलंबित; ग्रामस्थांच्या तक्रारीला यश

विक्रमगड तालुक्यातील नावाजलेली समजली जाणाऱ्या उटावली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेला अखेर निलंबित करण्यात आले आहे. वंदना प्रसाद असे त्यांचे नाव असून त्यांच्याविरोधात गैरकारभाराच्या अनेक तक्रारी होत्या. उटावली ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत ग्रामसेविका वंदना प्रसाद यांना विकास कामांची माहिती संदर्भात विचारणा केली. मात्र ग्रामस्थांना कुठलीही माहिती दिली नसल्याने ग्रामस्थांनी पंचायत समिती विक्रमगड येथे तक्रार केली होती. मात्र याकडे अधिकारीवर्गाने दुर्लक्ष केल्याने जिल्हापरिषद पालघर येथे तक्रार केली होती. पण, तरीही कारवाई न केल्याने ग्रामस्थ व प्रहार जनशक्ती पक्षाचे विक्रमगड तालुका अध्यक्ष यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन दिले होते. तसेच याप्रकरणी कारवाई न झाल्यास जनशक्ती पक्षाने उपोषणाचा इशाराही दिला होता.

बच्चू कडू यांनी याप्रकरणी आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेने वंदना प्रसाद यांची चौकशी सुरु केली होती. तलासरी आणि वाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेकडून देण्यात आले होते. गटविकास अधिका-यांनी केलेल्या चौकशीत वंदना प्रसाद यांच्यावर गैरकारभार केल्याच्या आरोपावर शिक्कामोर्तब झाले होते.

ग्रामसेविकेने ग्रामस्थांची दिशाभूल करून केलेल्या भ्रष्टाचाराची वारंवार तक्रार करूनही प्रशासन कारवाई करत नव्हते. शेवटी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यावर त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तसेच प्रहार जनशक्ती पक्षाने आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. प्रशासनाने वंदना प्रसाद या ग्रामसेविकेवर निलंबनाची कारवाई केली असली तरी फौजदारी कारवाई केलेली नाही. ग्रामसेविकेविरूद्ध कारवाई न करणारे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करून त्यांनाही निलंबित करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. अन्यथा आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
– शरद भडांगे, विक्रमगड तालुका अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष

ग्रामपंचायत लेटर पॅड छपाई, ग्रामकोष समिती कार्यालय फर्निचर खरेदी, बाकडे खरेदी कोटेशन मागवणे, वृक्ष लागवड दाखला , पावती व नमुना नंबर १५ साठा नोंदवही नसणे, ५ हजारावरील खर्च करताना कोटेशन तुलनात्मक नसणे, औषध फवारणी, गाळ काढणे इत्यादींमध्ये समितीने केलेल्या तपासणीमध्ये अनियमितता असल्याचे तपासणी समितीमधील वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तलासरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार दोन्ही गटविकास अधिकाऱ्यांनी प्रसाद यांच्या कामात अनियमितता असल्याचा ठपका ठेवला होता. त्याची दखल घेऊन पालघर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी उटावली ग्रामपंचायत ग्रामसेविका वंदना प्रसाद यांना १७ जून २०२१ रोजी सेवा (वर्तणूक) नियम १९६७ नियम ३ चे भंग केल्याप्रकरणी निलंबित केल्याचे आदेश पारित केले आहेत.

हेही वाचा –

पुरातन मेघराज मंदिराला रस्त्याची प्रतिक्षा

First Published on: June 25, 2021 12:04 AM
Exit mobile version