जव्हार पंचायत समिती संरक्षक भिंत जीर्णावस्थेत; अपघात होण्याची भीती

जव्हार पंचायत समिती संरक्षक भिंत जीर्णावस्थेत; अपघात होण्याची भीती

जव्हार: जव्हार पंचायत समिती कार्यालयाची संरक्षक भिंत, गेल्या तीन वर्षांपासून कमकुवत झाली असून मोडकळीस आली आहे. याकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत असून ,ही भिंत केव्हाही पडू शकते आणि यामुळे जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण ?असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत. या भागात लोकवस्ती असून लहान मुले,वृध्द नागरिक या रस्त्याहून ये- जा करीत असतात. शिवाय या संरक्षक भिंतीला लगतच आदिवासी विकास महामंडळ या कार्यालयाला जाण्यासाठी रस्ता असल्याने, या रस्त्यावरून अवजड वाहने, चार चाकी वाहने व दुचाकी वाहनांची नेहमीच रहदारी असते. अशावेळी जर भिंत पडली तर गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकते.

ही बाब लक्षात घेवून, पंचायत समिती प्रशासनाने या संरक्षक भिंतीचे काम त्वरित करावे अथवा ती भिंत जमीनदोस्त करावी, जेणे करून कोणत्याही प्रकारे अपघात होणार नाही ,अशी मागणी या भागातील रहिवासी केली आहे. वास्तविक पाहता पंचायत समिती कार्यालयाचे संरक्षण तर होत आहे. पण जर भिंत पडून मानवी नुकसान झाले तर ते काय भावात पडेल? असा खोचक सवाल येथील महिलांनी केला आहे.सगळी परिस्थिती ही उघड्या डोळ्यांनी दिसत असताना प्रशासन वेळकाढू पणा का करतय असा संभ्रम गेल्या तीन वर्षांपासून निर्माण झाला आहे.

पंचायत समितीच्या कार्यालयाची संरक्षक भिंत ही अधिक जुनी झाली असून कलंडली आहे.या भिंतीचे बांधकाम नव्याने करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून वरिष्ठ कार्यालयाकडे निधीसाठी कळविले आहे.
– ईश्वर पवार, गटविकास अधिकारी,पंचायत समिती,जव्हार.

पंचायत समितीची संरक्षक भिंत ही जवळ जवळ जीर्ण झाली असून मोठे खड्डे पडले आहेत. या भिंतीलगत रस्ता असल्याने येथून वाहनांची व लहान आणि वृद्धांची नेहमीच वर्दळ असते.त्यामुळे ही भिंत लवकर दुरुस्त करायला हवी.
-विशाखा अहिरे,माजी नगरसेविका

First Published on: May 18, 2023 9:56 PM
Exit mobile version