दारूची तस्करी करणारी टोळी जेरबंद

दारूची तस्करी करणारी टोळी जेरबंद

मोखाडाः गुजरातमधील दारुची चोरटी वाहतूक करून तस्करी करणार्‍या टोळीतील दोन जणांना मोखाडा पोलिसांनी शिताफीने अटक केली. यावेळी दोन आरोपी अंधाराचा फायदा उचलून जंगलात गायब झाले. यावेळी पोलिसांनी पावणेचार लाखांचा दारुसाठा आणि दारुची वाहतूक करणार्‍या तीन कार जप्त केल्या आहेत. गुजरातमधील नवसारी येथील दारु तस्कर आझाद उर्फ निजामुद्दीन हाफेस हा खानवेलहून वेगवेगळ्या कारमधून दारूची बेकायदा वाहतूक जव्हार-मोखाडामार्गे धुळे येथून पुन्हा गुजरातमध्येच विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल विभुते आणि मोखाडा पोलीस ठाण्याचे पमुख संजयकुमार ब्राम्हणे यांना वेगवेगळी पथके तयार करून कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिले होते.

त्यावरून मोखाडा जवळील निळमाती येथे नाकाबंदी करण्यात आली होती. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी जव्हारकडून येणारी कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता नाकाबंदीला लावलेले बॅरिकेट्स उडवून कारचा चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी पाठलाग करून गाडीसह चालक अमृतलाल दोडेजा (रा. नवसारी, गुजरात) याला ताब्यात घेतले. ही चौकशी सुरु असतानाच पाठीमागून आणखी दोन कार आल्या. पोलिसांनी चपळाई करून एका गाडीचा चालक ललितकुमार सुमड (रा. वापी, गुजरात) याला ताब्यात घेतले. पोलिसांची ही कारवाई सुरु असताना संधी साधून तिसर्‍या कारमधील दोन जण कार जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेऊन जवळचा जंगलात पळून गेल्याने पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या कारवाईत पोलिसांनी पावणेचार लाखांची चोरटी दारु आणि ३५ लाख रुपये किंमतीच्या तीन कार जप्त करत तस्करी करणार्‍या टोळीला दणका दिला आहे.

First Published on: May 21, 2023 9:55 PM
Exit mobile version