मनोर पोलिसांची बनावट दारूवर कारवाई

मनोर पोलिसांची बनावट दारूवर कारवाई

मनोर : अहमदाबाद महामार्गावरून गुजरात राज्याच्या दिशेने दमण बनावटीच्या दारूचा मोठा साठा गुजरात राज्याच्या दिशेने नेला जाणार असल्याची माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती. उपलब्ध माहिती नुसार मनोर पोलिसांनी मनोर विक्रमगड रस्त्यावरील जव्हार फाटा भागात सापळा रचला होता.रात्री बारा वाजताच्या सुमारास मनोर विक्रमगड रस्त्यावर जव्हार फाट्याच्या हद्दीत एका संशयित टेम्पोला थांबवून टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये दमन बनावटीच्या दारू वाहतूक करताना आढळून आला.टेम्पोमधील दारूच्या साठ्यासह टेम्पो चालक आणि क्लीनर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दमण बनावटीच्या दारूचे 320 बॉक्स आणि टेम्पोसह 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टेम्पो चालक अशोक कुमार गोखला राम (वय.27) आणि क्लीनर हसमुख पोपटभाई माथुकिया (वय.30)यांना अटक करण्यात आली आहे.

मनोर पोलिसांनी केलेल्या चौकशीत जप्त केलेला दारू साठा पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील म्हासरोली गावातील कुख्यात दारू तस्कर कल्पेश पाटील याचा असून गुजरात राज्यातील बडोदा येथे नेला जात असल्याची कबुली टेम्पो चालकाने दिली.कारवाई मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंधे यांच्या पथकाकडून करण्यात आली आहे. दारू तस्कर कल्पेश पाटील याच्यावर उत्पादन शुल्क विभागात तीन गुन्हे दाखल आहेत तर मनोर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.20 ऑगस्ट 2022 रोजी च्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर दहा दिवस न्यायालयीन कोठडी भोगल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.

First Published on: November 17, 2022 7:51 PM
Exit mobile version