पाच जणांचा मारेकरी २८ वर्षांनी जेरबंद

पाच जणांचा मारेकरी २८ वर्षांनी जेरबंद

इरबा कोनापुरे, भाईंदर : १९९४ साली एकाच कुटुंबातील महिला आणि तिच्या तीन लहानग्यांची हत्या करून फरार झालेल्या तीनपैकी एका मारेकर्‍याला काशिमीरा पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. या हत्यांकाडातील दोन मारेकरी अद्याप फरार आहेत. १६ नोव्हेंबर १९९४ च्या संध्याकाळच्या सुमारास काशिमीरा येथील पेणकरपाडा येथील भारवाड चाळीत राहणार्‍या राजनारायण शिवचरण प्रजापती यांच्या घरात घुसून तीन जणांनी राजनारायण यांची पत्नी जगराणीदेवी प्रजापती (२७), मुलगा प्रमोद (५), पिंकी (३), पिंटू (२) आणि तीन महिन्यांच्या लहानग्याची चॉपर आणि सुरीने भोसकून हत्या केली होती. या हत्याकांडाने ठाणे जिल्हा हादरला होता. याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात ही हत्या अनिल सरोज, सुनिल सरोज व काल्या ऊर्फ राजकुमार चौहान यांनी पूर्ववैमनस्यातून कट रचून केल्याचे उजेडात आले होते. अमानुष हत्याकांड गुन्हयातील मारेकरी फरार झाले होते. मारेकर्‍यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा, कक्ष १, काशिमिरा येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार पुष्पेंद्र थापा यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन गुन्हे शाखा, कक्ष १ काशिमीर्‍याचे अधिकारी व अंमलदार यांनी जून २०२१ मध्ये वाराणसी, उत्तरप्रदेश येथे २० दिवस मुक्काम ठोकून उत्तरप्रेदश पोलिसांच्या वाराणसी स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने तपास केला होता.

त्यावेळी एक मारेकरी काल्या ऊर्फ राजकुमार अमरनाथ चौहान हा उत्तरप्रदेशातील बनारस जिल्ह्यातील कैराडी गावचा रहिवासी असून तो कामानिमित्त परदेशी गेल्याची माहिती मिळाली होती. तो वर्षातून दोन तीन महिन्यासाठी मूळ गावी परत येत असतो. राजकुमार २०२० मध्ये वेस्ट्रो अकाउंट ऑफ दोहा अँड कतार या कंपनीत काम करण्यासाठी कतारला गेल्याचीही महत्वाची माहिती त्यावेळी पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानंतर राजकुमारचा पासपोर्ट मिळवून पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक ऑफ नोटीसही बजावली होती. ही महत्वाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या हालचालींवर नजर ठेवली होती. नजिकच्या काळात राजकुमार गावी येणार असल्याची माहिती हाती आल्यानंतर पोलिसांनी एअरपोर्ट अथॉरिटीलाही सतर्क केले होते. १९ डिसेंबर २०२२ च्या संध्याकाळी राजकुमार मुंबई विमानतळावर आल्यावर लुक ऑफ नोटीस असल्याने त्याला मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीने ताब्यात घेतले होते. नंतर काशिमीरा पोलिसांना पाचारण करून त्याला ताब्यात देण्यात आले.

First Published on: December 30, 2022 9:49 PM
Exit mobile version