वसई-विरारमध्ये राणे समर्थक एकाकी; ठाकूर भेटीमुळे भाजपला नाराजीचा फटका

वसई-विरारमध्ये राणे समर्थक एकाकी; ठाकूर भेटीमुळे भाजपला नाराजीचा फटका

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्याविरोधात वसई-विरार शहरात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली होती. याप्रकरणात नारायण राणे यांना जमीन मंजूर झाला असला तरी त्यांच्या समर्थनार्थ वसई भाजप पुढे आलेला नाही. परिणामी एकाकी पडलेले राणे समर्थक व भाजप उपजिल्हाध्यक्ष विश्वास सावंत चार-सहा कार्यकर्त्यांसोबत नालासोपारा पोलीस ठाण्यात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन देताना दिसले आहेत.

नारायण राणे यांनी शनिवारी, २१ ऑगस्ट रोजी वसईत जनआशीर्वाद यात्रा होती. या यात्रेत भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उल्हास आणि जोशात नारायण राणे यांचे स्वागत केले होते. या स्वागत आणि संवादाची छायाचित्र त्यांनी सोशल मीडियावरही प्रसारित केली होती. दिवसभर प्रचंड उत्साहात निघालेल्या यास्वागत यात्रेवर संध्याकाळी नारायण राणे यांनी बविआ आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन पाणी फेरले होते. या भेटीमुळे भाजप कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी पसरली.

युवा जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सिद्धेश तावडे व भाजप भटके व विमुक्त महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक शेळके यांनी याविरोधात घोषणाबाजी केली होती. मात्र नारायण राणे व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आमची ३० वर्षांपूर्वीची मैत्री आहे, असे सांगत या भेटीचे समर्थन केले होते. नारायण राणे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात मैत्रीचे संबंध असतीलही. पण अशाप्रकारे राणे यांनी ठाकूर यांना भेटणे योग्य नाही. राणे यांची जनआशीर्वाद यात्रा हा पक्षाचा कार्यक्रम आहे. या यात्रेदरम्यान राणे हे ठाकूर यांना भेटल्याने वेगळा संदेश गेला आहे. या भेटीचा उपयोग बहुजन विकास आघाडीकडून येणाऱ्या निवडणुकीत करून घेतला जाईल. त्याचा फटका ठाकूर यांच्याविरोधात लढताना भाजपला बसेल, अशी खंत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी व्यक्त केली होती.ज्यांच्याविरोधात पक्षाला लढायचे आहे. त्यांच्याच मांडीला मांडी लावून आमचे नेते बसत असतील तर वसई विरारमध्ये पक्षाला भवितव्य काय असणार?, असा प्रश्न वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ नूर शेख यांनी केला होता.

वसई भाजपमध्ये नारायण राणे यांच्या कृतीबाबत नाराजी असतानाच; महाड येथे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. या विरोधात महाराष्ट्रभरात शिवसेना भाजप आणि नारायण राणे यांच्या विरोधात एकवटली असतानावसई भाजपने मात्र या प्रकरणात अलिप्त रहाणे पसंत केले आहे.

विशेष म्हणजे या प्रकणात परिवहन मंत्री अनिल परब दबाव होता, हे समोर आल्यानंतरही वसई भाजप शिवसेनेविरोधात प्रतिक्रिया देण्याकरता पुढे आलेला नाही. परिणामी राणे समर्थक असलेल्या विश्वास सावंत यांनाच नालासोपारा पोलिसांना हा गुन्हा दाखल करून घेण्याचे निवेदन द्यावे लागले आहे. नारायण राणे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतरच विश्वास सावंत यांनाही वसई भाजपमध्ये प्रवेश देऊन जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी पावन करून घेतले होते. विशेष म्हणजे त्यांना उपजिल्हाध्यक्ष पदही मिळाले होते. तेव्हापासून राजन नाईक यांच्यासोबत प्रत्येक आंदोलनात आणि सभेत विश्वास सावंत सावलीसारखे होते. परंतू कालच्या प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी अंग काढून घेतल्याने राणे समर्थक विश्वास सावंत एकटे पडले आहेत. तर भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. यामागे नारायण राणे यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची घेतलेली भेट हेच कारण सांगितले जात आहे.

हेही वाचा – 

नारायण राणेंच्या रडारवर शिवसेनेतील तीन मंत्री

First Published on: August 25, 2021 8:42 PM
Exit mobile version