महामार्गावर तेल टँकरचा अपघात

महामार्गावर तेल टँकरचा अपघात

डहाणू: मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी तपासणी नाक्यावर रविवार 21 मे रोजी पहाटे 5.30 च्या सुमारास एका कच्चे तेल वाहतूक करणार्‍या टँकरचा अपघात झाला. अपघातात टँकरला छिद्र पडल्यामुळे साधारण एक किलोमीटर परिसरात तेल सांडले होते. याच ठिकाणी रात्री 2 वाजताच्या सुमारास एका ट्रकचा देखील भीषण अपघात झाला.दापचरी सीमा तपासणी नाक्याजवळ लहान वाहनांच्या वाहतुकीसाठी सरळ मार्ग ठेवण्यात आला असून मोठ्या वाहनांसाठी मोठे वळण घेऊन वजन काट्यावरून रस्ता ठेवण्यात आला आहे. छोट्या वाहनांसाठी ठेवण्यात आलेल्या मार्गावर कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वेळोवेळी याठिकाणी अपघात होत असतात.

त्यातच रविवरी मध्यरात्रीच्या सुमारास एका ट्रक चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे सिमेंट ब्रँकेट ला धडकून अपघात झाला. त्यांनतर पुन्हा पहाटेच्या सुमारास एका तेल वाहून नेणार्‍या टँकर छोट्या वाहनांच्या रांगेत शिरल्यावर अज्ञात ठिकाणी टँकरची कट लागल्यामुळे टँकरला मोठे छिद्र पडून त्यामधून मोठी तेल गळती झाली. शेकडो लिटर तेल महामार्गावर सांडले असून साधारण एक किलोमीटरपर्यंत हे तेल पसरले होते.दरम्यान छोट्या वाहनांच्या मार्गावर तेल पसरल्यामुळे काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती. महामार्ग पोलीस आणि तलासरी पोलीस यांनी घटनास्थळी दाखल होत तत्काळ याबाबत महामार्ग प्राधिकरणाला कळवून तेल पसरलेल्या भागात माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला आहे.

First Published on: May 22, 2023 8:55 PM
Exit mobile version