सेंद्रिय खतांवर पिकवला एक हजार गोणी लाल कांदा

सेंद्रिय खतांवर पिकवला एक हजार गोणी लाल कांदा

वाडा:  भातशेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या पालघर जिल्ह्यातील शेतकरी आज वेगवेगळ्या प्रकारची नगदी पिके घेऊ लागला आहे. या शेतकर्‍यांमधील वाडा तालुक्यातील एका शेतकर्‍याने सेंद्रिय खतांवर तब्बल एक हजार गोणी (500 क्विंटल) लाल कांद्याचे उत्पादन घेतले आहे. भाताचे कोठार असलेल्या पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी भातशेती ऐवजी रब्बी हंगामात वेगवेगळ्या प्रकारच्या नगदी पिकांवर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे.

मोठ्या प्रमाणात कलिंगड, टरबुज, केळी, फुलशेतीबरोबर शेंगदाणा, सुर्यफूल, कांदा शेती करु लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाडा, विक्रमगड तालुक्यात सफेद कांद्याचे उत्पादन घेतले जात आहे, यावर्षी भावेघर ता. वाडा येथील संजय पाटील या प्रयोगशील शेतकर्‍याने सेंद्रिय खतांचा वापर करून चार एकर जमीनीत तब्बल 1000 गोणी म्हणजेच 500 क्विंटल लाल कांद्याचे उत्पादन घेतले आहे. गेल्या दहा वर्षांपासून संजय पाटील व त्याची पत्नी पाटील आपल्या 7 एकर शेत जमिनीत वेगवेगळी नगदी पिके घेऊन ती यशस्वी करीत आहेत. पाच वर्षांपूर्वी 3 एकरमध्ये ऊसाचे पीक, गतवर्षी 2 एकरमध्ये शेंगदाणा व 3 एकरमध्ये सुर्यफुलाचे यशस्वी उत्पादन घेतले होते. यावर्षी त्यांनी लाल कांद्याची यशस्वी शेती केली आहे. खरिप हंगामात वाडा कोलमचेही ते उत्पादन घेत असून दरवर्षी 14 ते 15 मेट्रिक टन तांदूळाची विक्री करीत असतात.

स्वत: उत्पादक व विक्रेता

संजय पाटील हे वेगवेगळ्या प्रकारचे नगदी पिके घेऊन थांबत नाहीत, तर त्यांनी आपल्या घरीच मोठ्या प्रमाणात घाऊक विक्रीची व्यवस्था निर्माण केली आहे. यासाठी त्यांनी चार हजार स्क्वेअर फूट जागेत मोठमोठे गाळे तयार केले असून शेतात पिकविलेली उत्पादने ते घाऊक दराने विक्री करीत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ, कडधान्य व यावर्षी लाल कांदा अशा उत्पादनाची शेतातून थेट ग्राहक अशी विक्री सुरु आहे.

कोट
सेंद्रिय खते व जिवामृत यांचा वापर करून पिकविलेला हा लाल कांदा 8 ते 10 महिने टिकाऊ आहे.

-संजय पाटील – भावेघर,

First Published on: May 16, 2023 8:25 PM
Exit mobile version