सेवा ज्येष्ठता वगळून कर्मचार्‍यांना कायम करण्याला विरोध

सेवा ज्येष्ठता वगळून कर्मचार्‍यांना कायम करण्याला विरोध

सचिन पाटील, बोईसर : ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची सेवा ज्येष्ठता यादी वगळून आपल्या समाज बांधवांना ग्रामपंचायतीच्या सेवेत कायम करण्याचा बेकायदेशीर ठराव ग्रामविकास अधिकार्‍यांनी केल्याचा आरोप करीत बोईसर ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.ग्रामविकास अधिकार्‍याच्या मनमानी कारभारा विरोधात ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.उद्या बोईसर ग्रामपंचायतीचे नाराज कर्मचारी एक दिवसासाठी कामबंद आंदोलन करून ग्रामविकास अधिकार्‍याचा निषेध करणार आहेत. बोईसर ग्रामपंचायत कार्यालयात वेगवेगळ्या विभागात शंभर पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.अनेक कर्मचार्‍यांच्या सेवेला दहा ते पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत.परंतु बोईसर ग्रामपंचायतीच्या २२ डिसेंबर २०२२ रोजी पार पडलेल्या मासिक सभेत संदीप वडे,प्रियेश पाटील आणि हिमांशु संखे यांना त्यांचा ग्रामपंचायतीच्या सेवेत कायम कर्मचारी म्हणून नेमणुकीचा अर्ज केलेला नसताना ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांनी पदाचा गैरवापर करून बेकायदेशिरपणे सेवेत कायम करून घेण्याचा ठराव परित केल्याचा आरोप होत आहे.

हिमांशु संखे हा ‘आपले सेवा केंद्रा’मध्ये ऑपरेटर म्हणून कार्यरत असून जिल्हा परिषदेमार्फत त्याची आपले सेवा पोर्टल चालविण्यासाठी नेमणूक केलेली आहे. त्याचा ग्रामपंचायतीच्या कामकाजात संबंध नाही. ग्रामपंचायत कर्मचारी नसतांना ग्रामविकास अधिकारी हिमांशू संखे याला ग्रामपंचायतीच्या सेवेत कायम करण्याचा ठराव केला आहे.संदीप वडे याच्या पेक्षा सेवा ज्येष्ठता असलेल्या १४ तर प्रियेश पाटील याच्या पेक्षा जेष्ठता असणार्‍या २७ कर्मचार्‍यांना डावलून दोघांना सेवेत कायम करण्याचा ठराव ग्रामविकास अधिकार्‍यांनी केला आहे.त्यामुळे आदिवासी,दलीत आणि मागासवर्गीय कर्मचार्‍यांवर अन्याय असल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे.

 

कोट –

बोईसर ग्रामपंचायत कर्मचारी कायम करणे प्रकरणात अनियमितता आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.

-चंद्रशेखर जगताप
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.),जि.प.पालघर

First Published on: January 23, 2023 10:20 PM
Exit mobile version