…अन्यथा कारवाईला सामोरे जा

…अन्यथा कारवाईला सामोरे जा

डहाणू : पंचायत समिती डहाणू अंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली विकास कामे आणि विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी विकास कामांचा आढावा घेत असताना तालुक्यातील अपूर्ण कामांचा आढावा घेत “मार्च अखेर अपूर्ण कामे पूर्ण करा अन्यथा कारवाईला सामोरे जा” असा इशारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी ठेकेदारांना दिला आहे. तसेच डहाणू तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेऊन तालुक्यातील अपूर्ण असलेल्या 40 कामांबाबत वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामीण आदिवासी भागातील सोयी सुविधा पुरवण्यासाठी आखण्यात आलेल्या योजना अपूर्ण असल्यामुळे ठेकेदारांनी जाणीवपूर्वक आदिवासींना सोयीसुविधांपासून वंचित ठेवल्यामुळे संबंधित ठेकेदारांवर अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्याचा इशारा अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिला.

उपाध्यक्ष पंकज कोरे यांनी शाळेच्या धोकादायक इमारती, वर्गखोल्या, शाळा यांची दुरुस्ती प्राधान्य क्रमाने करण्याचे सुचवले. तसेच सायवन, तवा, एना येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वीज जोडणी आणि पाणीपुरवठा नसल्याने वापरात नाहीत त्यामुळे येत्या 15 दिवसात यांची कामे पूर्ण करावी ,अन्यथा उपोषण करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी दिला आहे.यावेळी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत सरपंच उपस्थित होते. त्यांना गावाचा विकास करण्यासंदर्भात प्रतिपादन अध्यक्षांनी केले आहे.यावेळी जिल्हा आणि तालुकास्ततरीय सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि बहुतांश सरपंच उपस्थित होते. सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जि.प.उपाध्यक्ष पंकज कोरे आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

First Published on: February 23, 2023 8:19 PM
Exit mobile version