तारापूरच्या कॅलेक्स केमिकल कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

तारापूरच्या कॅलेक्स केमिकल कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला अतिशय घातक अशा रासायनिक घनकचर्‍याची बेकायदेशीर विल्हेवाट लावल्याप्रकरणी तारापूरच्या एका कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उचलला आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्र एम ४ आणि एम १५ मधील कॅलेक्स केमिकल आणि फार्मास्युटीकल्स लिमीटेड या कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या कंपनीच्या आवारातच घातक रासायनिक घनकचरा साठवलेले ड्रम जमिनीत पुरून त्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता.औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यामधून निघणारा सर्व रासायनिक घनकचरा पुढील प्रक्रिया करण्यासाठी नवी मुंबई तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीकडे पाठवणे अत्यावश्यक असताना कॅलेक्स केमिकल आणि फार्मास्युटीकल्स कंपनीने मात्र जमिनीखाली गाडून त्याची विल्हेवाट लावली होती.

 

याची माहीती तारापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला लागताच उपप्रादेशिक अधिकारी गायकवाड यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या मदतीने कंपनीच्या आवारातील जागेचे खोदकाम केले. आतमध्ये घातक रसायनाने वितळून गेलेले प्लास्टीक ड्रम आणि उग्र वास येत असलेला रासायनिक घनकचरा आढळून आला. याप्रकरणी उपप्रादेशिक अधिकारी यांनी रासायनिक घनकचर्‍याचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तर मानवी आरोग्य आणि पर्यावरणास अतिशय घातक अशा रासायनिक घनकचर्‍याची बेकायदेशीर विल्हेवाट लावल्याप्रकरणी कॅलेक्स केमिकल आणि फार्मास्युटीकल्स कंपनीवर उत्पादन बंदीची कारवाई व्हावी, यासाठीचा प्रस्ताव ठाणे येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा –

राजद्रोहाच्या कलमाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

First Published on: May 11, 2022 4:33 PM
Exit mobile version