मुंबई – अहमदाबाद महामार्गावर समस्या कायम

मुंबई – अहमदाबाद महामार्गावर समस्या कायम

डहाणू :  मुंबई -अहमदाबाद महामार्गावर महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालक व प्रवाशी त्रस्त आहेत. अनेक त्रुटींमुळे महामार्गावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना ताज्या असतानाच महामार्गावर परिसरामध्ये माहिती दर्शक फलक नीट दिसत नाहीत. मुंबई -अहमदाबाद महामार्ग सायरस मेस्त्री यांच्या निधनामुळे जास्त चर्चेत आला. त्यांच्या निधनाने प्रशासन, रस्ते विभाग, पोलीस प्रशासन , राज्यकर्ते जागे होऊन सध्या महामार्गावर डागडुजी, अवैध कट बंद करणे, विविध ठिकाणी सूचना फलक लावणे, अपघात स्थळी बोर्ड लावणे, अरुंद पुलाजवळ झिक झाक पट्टे , सिग्नल, लावले जात आहेत. महामार्गावर तांत्रिक त्रुटींसह महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष या अपघातांना कारणीभूत ठरत आहेत, असे आरोप केले गेले. महामार्ग प्राधिकरणामार्फत आधी व आता नियुक्त केलेल्या देखभाल दुरुस्ती ठेकेदारामार्फत योग्य ती उपाययोजना व देखभाल दुरुस्ती व्यवस्थित न केल्यामुळे त्याचा फटका महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर बसत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून चारोटी उड्डाणपुलाखाली रस्ता खराब होता. खड्डे पडले होते. तो रस्ता शनिवारी संध्याकाळी ८वाजता अंधारात डांबरीकरण केला. तो डांबरीकरण केला जात असताना तेथे पडलेल्या खडी वरच डांबर खडी टाकून कोणतीही काळजी न घेता केला असा आरोप तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी केला. महामार्ग प्राधिकरण या गंभीर बाबीकडे लक्ष देत नाही असे आरोप केले जात आहेत. महामार्गावर गस्ती पथक नीट काम करत नाही. तक्रार करण्यासाठी असलेली संपर्क यंत्रणाही संपर्कहीन असल्यामुळे याबाबतची तक्रार नेमकी कोणाकडे करावी असा प्रश्न उपस्थित होतो.
महामार्गावर अनेक उपाययोजनांची वानवा असल्याने महामार्ग प्राधिकरणाला जबाबदार धरून त्यांच्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कठोर सूचना दिल्या होत्या. तसेच कामात त्रुटी ठेवल्यामुळे महामार्ग प्राधिकरणाचे काम करणार्‍या कंत्राटदारावर व त्याच्या प्रतिनिधीवर पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही महामार्गावर अनेक उपाययोजनांची असुविधा कायम आहे.

First Published on: November 3, 2022 9:38 PM
Exit mobile version