बांधकाम कामगाराची एक रुपयात नोंदणी; जिल्ह्यात २६ हजार कामगार

बांधकाम कामगाराची एक रुपयात नोंदणी; जिल्ह्यात २६ हजार कामगार

जव्हार: पालघर हा आदिवासी जिल्हा असून निरक्षरता प्रमाण अधिक आहे. यामुळे इमारत, मनरेगा व वीट भट्टी कामगाराची संख्या अधिक आहे. कामगारांनी काम करीत असताना कोणत्याही प्रकारे दुर्घटना झाल्यास किंवा स्वतः अगर कुटुंबाच्या हिताची कोणतीही शासकीय योजनेेचा उपभोग घ्यावयाचा झाल्यास आता ऑनलाइनद्वारे केवळ एक रुपयांत नोंदणी होत असल्याने जिल्ह्यातील २६ हजार कामगारांना लाभ घेण्याची एक नामी संधी आली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध कल्याणकारी राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर कामगारांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ एक रुपया एवढे नाममात्र शुल्क घेतले जाते.

सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जात होते. त्यासाठी कार्यालयात मोठी गर्दी होत होती.आता मात्र ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही सेतू केंद्रात जाऊन आपल्या नावाची नोंदणी करता येते.

नोंदणी कशी कराल?
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या www.mahabocw.in या वेबसाइटवर कामगाराची नोंदणी करता येते. मागील वर्षात ९० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा जन्मदाखला, बँक पासबुक, शिधापत्रिका, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आवश्यक आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी तर दरवर्षी नूतनीकरण आवश्यक आहे. अन्यथा या योजनांचा लाभ दिला जात नाही. नोंदणी झाल्यानंतर संबंधित कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्ती, आरोग्य साहाय्य, सामाजिक साहाय्य, आर्थिक साहाय्य आदी योजना राबविल्या जातात. ऑनलाइन नोंदणीसाठी केवळ एक रुपया एवढे नाममात्र शुल्क महामंडळामार्फत आकारले जाते.

First Published on: March 28, 2023 9:50 PM
Exit mobile version