जव्हार शहर आणि ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांची वाढ

जव्हार शहर आणि ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांची वाढ

संग्रहित छायाचित्र

अतिक कोतवाल, जव्हार: तालुक्यात अधिक लोकवस्ती ही आदिवासीबहुल, दुर्गम व ग्रामीण क्षेत्रात आहे. यातील नागरिक अत्यंत गरीब कुटुंबातील तसेच अशिक्षित आहेत.या गरीब कुटुंबातील रुग्णांना मोठ्या अधिकृत रुग्णालयातील महागडे औषधोपचार घेणे परवडत नसल्याने हे रुग्ण जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. मात्र अनेक डॉक्टर रुग्णालय नोंदणी न करता देखील वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेकांच्या जीवाशी हे बोगस डॉक्टर खेळत असल्याचे समोर आले आहे. हे बोगस डॉक्टर अपूर्ण माहितीच्या आधारावर रुग्णांना औषधे देत असल्याने यामुळे अनेकांना गंभीर आजारांचादेखील सामना करावा लागला आहे. तालुक्यातील अनेक विभागांमध्ये कामकाज हे प्रभारीच्या माध्यमातून सुरू आहे. त्यातच अपुरे कर्मचारी समस्या यामुळे येथील जनता अधिकच त्रस्त आहे.असे असताना शहर आणि ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांची संख्या वाढत चालली असून यावर प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
रुग्णालयाची परवानगी आणि नोंदणी नसताना हे बोगस डॉक्टर तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी तसेच सर्वसामान्य गोरगरिबांच्या जिवाशी खेळत असल्याचे चित्र आहे. असे असताना देखील अशा बोगस डॉक्टरांचा प्रशासनाद्वारे शोध घेऊन कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जव्हार शहर आणि परिसरात विना नोंदणी दवाखाने आणि बोगस डॉक्टरांचे काम सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधित यंत्रणेमार्फत कारवाई केली जाईल.
डॉ. रामदास मराड, वैद्यकीय अधीक्षक, पतंग शहा उपजिल्हा रुग्णालय, जव्हार

माझ्या माहितीनुसार तालुक्यात बोगस डॉक्टर उपचार करीत नाहीत. परंतु तरीही कुणाच्या निदर्शनास आल्यास कळवावे,यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
डॉ.किरण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी ,जव्हार

First Published on: January 24, 2023 9:10 PM
Exit mobile version