श्रध्दाच्या स्मरणार्थ वसईत मौन रॅली

श्रध्दाच्या स्मरणार्थ वसईत मौन रॅली

wवसई ।  श्रद्धा वालकर हिच्या हत्याप्रकरणी एक वर्ष पूर्ण होत असून अती संवेदनशील असलेले हे प्रकरण जलदगती न्यायालयात घेण्यासाठी वसईत १७ मे रोजी लाँग मार्च व मौन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मूक आंदोलनाच्या शासकीय परवानगीसाठी सोमवारी दुपारी श्रद्धाचे वडील विकास वालकर तहसीलदार कार्यालयात आले होते. तहसीलदार अविनाश कोष्टी उपस्थित नसल्याने त्यांनी नायाब तहसीलदार चंद्रकांत पवार यांची भेट घेतली. वालकर यांच्यासोबत सामाजिक संस्थेचे पदाधिकारी होते.

१८ मे २०२२ रोजी श्रद्धाची तिचा प्रियकर आफताब याने दिल्लीत हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. देशासह जगाला हादरवणार्‍या या हत्या प्रकरणाने सर्वांचा थरकाप उडाला होता. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. सर्वसामान्य जनता, न्यायपालिका, पोलीस यंत्रणा यांना पुन्हा अशी कुणी श्रद्धा बनू नये याचे स्मरण रहावे म्हणून या मौन रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे वालकर यांच्यातर्फे सामाजिक संस्थानी स्पष्ट केले. १७ मेला संध्याकाळी ४ वाजता संस्कृती सोसायटी , वसई येथून ही रॅली सुरु होईल. त्यानंतर तहसीलदार वसई यांना निवेदन देऊन सदर रॅली माघारी जाणार आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

First Published on: May 15, 2023 10:01 PM
Exit mobile version