शिक्षक असतात निवांत, शिक्षणाचा गाडा संथ

शिक्षक असतात निवांत, शिक्षणाचा गाडा संथ

मोखाडा : ग्रामीण भागातील प्रत्येक गाव पाड्यांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी शासन स्तरावर सर्वच मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत, मोफत शिक्षण, मोफत गणवेश, वह्या – पुस्तके, पोषण आहार इत्यादी उपक्रम राबविले जातात. मात्र, मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जेथे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, तेथे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या लेटलतिफ कामामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.

बिवलपाडा, दापटी, धामोडी, करोळी, आसे, ब्राम्हणपाडा, कुडवा, धामणी, केवनाळे, सुर्यमाळ, आडोशी, काकडोशी, बोटोशी, करोळ, पाचघर आदी परिसर तालुक्यापासून २० ते २५ किलोमीटर अंतरावर असल्याने या परिसरातील जिल्हा परिषद शिक्षक शाळा सुरू होण्याच्या वेळेच्या पंधरा ते वीस मिनीटे उशिरा येत असून पंधरा मिनिटे लवकर शाळांना सुट्टी देतात तर तालुका मुख्यालयापासून अवघ्या पाच सहा किलोमीटर अंतरावरील शिक्षक महाशयांचा जव्हार चौफुली येथे दहा पंधरा मिनिटे थांबून शाळेत उशिरा जाण्याचा दिनक्रम सुरू असतो. मुळात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या शाळा साडे दहा वाजता सुरू होतात व पाच वाजता शाळांना सुट्टी होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेतील अर्धातास वाया जात असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य शिक्षकांच्या लेटलतिफ कामामुळे धोक्यात आले आहे,असे असताना ही पंचायत समितीचा शिक्षण विभागा या शिक्षकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर करत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील ऐंशी टक्के शिक्षक तालुक्याला निवासी न राहता नाशिक, त्र्यंबकेश्वर या ठिकाणांहून आलिशान गाड्यांनी ये -जा करतात. त्यामुळे लेटलतिफ कारभाराचा गाडा नेहमीचाच झाला असल्याची ओरड आदिवासी पालक वर्गातून सातत्याने केली जात असते.

दांडी बहादर शिक्षक आढळल्यास संबंधित शिक्षकांच्या सेवा पुस्तकांवर तशी नोंद केली जाईल तसेच आपल्या गावातील शिक्षक उशिरा येत असतील तर स्थानिक नागरिकांनी मला लगेच कळवावे तसेच ग्रामपंचायत कार्यालय सुध्दा ९:४५ वाजता सुरू होऊन ६ : १५ पर्यंत चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत..

– प्रकाश निकम, अध्यक्ष जिल्हा परिषद

पालघर तथा राज्यमंत्री दर्जा

First Published on: December 1, 2022 10:28 PM
Exit mobile version