पालघरमध्ये ताडगोळे विक्रीचा व्यवसाय तेजीत

पालघरमध्ये ताडगोळे विक्रीचा व्यवसाय तेजीत

ताडगोळा म्हणजे उष्णतेची दाहकता आणि काहिली कमी करणारे थंड, मधुर, रसदार फळ. सध्या दिवसेंदिवस उष्णतेचा उच्चांक वाढत असताना ताडगोळ्यांना असणारी मागणीही वाढत असून पालघर जिल्ह्यातील अनेक गोरगरिबांना या फळामुळे रोजगार उपलब्ध होत आहे.

पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर, डहाणू तसेच विक्रमगड, जव्हार या तालुक्यांतील ग्रामीण भागांत ताडगोळे विक्रीचा व्यवसाय केला जातो. उंचच्या उंच ताडाच्या झाडावर चढण्यात पटाईत असलेल्या अनेक तरुणांना या कालावधीत चांगला रोजगार मिळतो. मुंबई, ठाणे, वसई-विरारसारख्या शहरी भागांतून या ताडगोळ्यांना मोठी मागणी असते. उन्हाळ्यात उष्णतेमुळे उद्भवणार्‍या विविध आजारांवर हे ताडगोळे अत्यंत उपयोगी ठरतात.

पोटातील उष्णता कमी करण्यासाठी, मूत्रसंसर्ग रोखण्यासाठी, प्रसंगी तहान शमविण्यासाठी ताडगोळ्यांचा वापर पूर्वीपासून आजतागायत होत असून ताडगोळ्यांचे अनेक फायदेही सांगितले जातात. सध्या एक डझन ताडगोळ्यांची किंमत ८० ते १०० रुपयांपर्यंत आहे, परंतु तरीही ताडगोळेप्रेमी मोठ्या संख्येने ताडगोळे घेताना दिसतात. या फळाने पालघर जिल्ह्यातील अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत ताडाच्या (माड) झाडाला येणार्‍या फळामधून थंडगार, मधुर ताडगोळे मिळतात. नारळाच्या आकाराच्या असलेल्या एका फळामध्ये तीन ते चार ताडगोळ्यांचे गर असतात. एका झाडावर १५० ते २०० ताडगोळे मिळत असल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी उदरनिर्वाहाचे साधन निर्माण झाले आहे.

ताडगोळे हे फळ शारीरिक गारवा टिकविण्यासह रोजगाराचे साधनही ठरत आहे, मात्र हे फळ उंच झाडावरून उतरविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. सध्या हे फळ उतरविण्यासाठी मोजकेच लोक असून एकंदरीत खर्च पाहता यंदा काही प्रमाणात भाववाढ करावी लागली आहे.
– राजेश मानकर, ताडगोळे व्यावसायिक, सफाळे

First Published on: May 2, 2022 5:00 AM
Exit mobile version