हळवार भात कापणीवर पावसाची टांगती तलवार

हळवार भात कापणीवर पावसाची टांगती तलवार

वाडा :  तालुक्यात बहुतांशी शेतकरी हा हळवार, निमगरवा व गरवा अशा तीन प्रकारच्या भातपिकाची लागवड करीत असतो. सर्वप्रथम हळवार भातपिक हे १०० दिवसाच्या आसपास कापणीस तयार होत असते.त्यानुसार हळवार भातपिक हे कापणीस तयार झाले असून शेतकर्‍यांनी भातकापणी करण्यास सुरुवात केली आहे.
तालुक्यात आजपर्यंत पावसाचा मुक्काम कायम असून सर्वच भागात गेले अनेक दिवस होत असलेल्या पावसामुळे तयार झालेल्या भातपिकाची नासाडी होऊन हातातोंडाशी आलेले घास निघून जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झालेला दिसत आहे.कर्जत-३,सोना राजागोल्ड, गुजरात-४ , पुनम, समृद्धी, सुंदर, व एम.टी. यू.-१०-१० आदी हळवार भाताचे वाण आहेत. गुजरात-११,वाय.एस.आर.,दप्तरी-१२५, वाडा झिनिया, रुपाली, गुजरात-१७ ,कर्जत-४ हे वाण निमगरवा आहेत.तर सुवर्णा, जया, वाडा कोलम, मसूरी,एम.टी.यू.७०२९, सुपर वाडा कोलम ही गरवा भाताची वाणे आहेत.
हळवार भातपिक हे ९० ते ११० दिवसात तयार होत असते. निमगरवा भातपिक हे १२० ते १२५ दिवसात तयार होत असते. तर गरवा भातपिक हे १३० ते १४० दिवसात तयार होत असते. वाडा तालुक्याला भाताचे कोठार समजले जात असले तरी निसर्गाच्या लहरीपणासह मजुरांची कमतरता, खते, बि- बियाणे याचे वाढते दर अशा अनेक कारणांनी शेती करणे ही कठीण होऊन बसले आहे. पावसाचा मुक्काम असाच कायम राहिला तर कापणीस तयार झालेल्या हळवार भातपिकांची संपूर्ण नासाडी होऊन शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती शेतकरी अजित पाटील यांनी व्यक्त केली आहे.

First Published on: October 2, 2022 10:01 PM
Exit mobile version