पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाचे शवविच्छेदनगृह बनले दारूचा अड्डा

पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाचे शवविच्छेदनगृह बनले दारूचा अड्डा

भाईंदर तळीराम

भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृह दारूचा अड्डा बनला आहे. होळीनिमित्त मध्यरात्री रुग्णवाहिका चालक व इतर कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदनगृहात दारू पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याची बातमी करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवरच मद्यपींनी हल्ला केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मिरा-भाईंदर महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पंडित भीमसेन जोशी रुग्णालय बांधले. परंतु खर्च परवडत नसल्यामुळे व स्वतः चालवू शकत नसल्यामुळे महापालिकने रुग्णालय राज्य शासनाकडे हस्तांतरित केले आहे. कोरोना काळात या रुग्णालयात सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका चालकांनी रुग्णवाहिकेमध्येच बसून दारू पार्टी केल्याचा प्रकार पत्रकारांनी उघडकीस आणला होता. याच रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आता दारूचा अड्डा बनवला आहे.

घडलेली घटना ही निंदनीय आहे. याघटनेची चौकशी करण्यासाठी तीन डॉक्टरांची समिती नेमली आहे. या घटनेच्या चौकशीचा अहवाल प्राप्त होताच त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
– जाफर तडवी, शल्य चिकित्सक, पंडित भीमसेन जोशी रुग्णालय

होळीनिमित्त गुरुवारी मध्यरात्री रुग्णवाहिका चालक व इतर आठ ते दहा जण शवविच्छेदनगृहात शवविच्छेदन करण्यासाठी असणाऱ्या कठड्यावर दारूची पार्टी करत असल्याची माहिती पत्रकारांना मिळाली. काही पत्रकार माहिती घेण्यासाठी गेले असता शवविच्छेदनगृहात दारू पार्टी सुरू असल्याचे दिसून आले. तेव्हा फोटो व व्हिडीओ घेण्यास सुरुवात केली असता त्या मद्यपींनी शिवीगाळ करत एका पत्रकाराला मारहाण केली. याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत भाईंदर पोलीस ठाण्यात अनोळखी सहा इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्यापपर्यंत दारू पार्टी करणाऱ्या मद्यपींना अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, धक्कादायक प्रकार म्हणजे या शवविच्छेदन गृहाबाहेरील व आतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचेही उजेडात आले आहे.

हेही वाचा –

ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी; उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील कारवाईवर संजय राऊत संतापले

First Published on: March 22, 2022 9:00 PM
Exit mobile version