वसईत भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ

वसईत भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ

वसई : वसई -विरार महापालिका भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत असल्याचे वसईत एकाच दिवशी दहा जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. महापालिकेचे श्वान निर्बिजीकरण केंद्रही अद्याप सुरु न झाल्याने भटक्या कुत्र्यांना त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.भटक्या कुत्र्यांच्या समस्येने वसई- विरारमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांवर, गल्ली बोळात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून रात्री-बेरात्री कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना वाढत आहेत. महापालिकेच्या चुळणे, माणिकपूर परिसरात दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी दहा जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. त्यात शाळकरी मुलांचाही समावेश आहे. भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त केला नाही तर काँग्रेस पक्ष एच प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा ब्लॉक अध्यक्ष विल्फ्रेड डिजुझा यांनी दिला आहे. शहरातील श्वान निर्बिजीकरण केंद्र बंद आहे.

ठेकेदार मिळत नसल्याने केंद्र सुरु होण्यास उशिर होत असला तरी शहरातील श्वानांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचा एक भाग म्हणून शहरातील भटक्या श्वानांची गणना केली जाणार आहे. महापालिका प्रथमच अशा प्रकारची श्वान गणना करणार आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून अद्याप श्वानगणना झालेली नाही. यामुळे शहरात नेमकी भटकी श्वाने किती आहेत याची अधिकृत आकडेवारी महापालिकेकडे नाही. परिणामी निर्बिजीकरणावर परिणाम होताना दिसत आहे. श्वान गणना करणे पालिकेला बंधनकारक आहे. म्हणूनच महापालिकेने शहरातील भटक्या श्वानांची दर ५ वर्षांनी भटक्या गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे श्वानगणना करण्यासोबतच महापालिका मांजरांचीही गणना करणार आहे.

First Published on: April 5, 2023 8:35 PM
Exit mobile version