वेळ आलीय…गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाची

वेळ आलीय…गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाची

कुणाल लाडे,डहाणू : पालघर जिल्ह्यातून जाणार्‍या मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या नद्या आणि नैसर्गिक वाहणार्‍या ओहळात रसायनयुक्त द्रवपदार्थ सोडण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे जलस्रोतांचे पाणी दूषित होऊन गोड्या पाण्यातील लाखो मासे मरण पावतात. बदलते वातावरण आणि औद्योगिकीकरणाने गोड्यापाण्यातील माशांच्या अनेक जाती नष्ट झाल्या असताना घातक रसायन सोडण्याने आणखी धोका वाढला आहे. त्यामुळे उपलब्ध गोड्या पाण्यातील मत्स्यबीजाच्या संवर्धनासाठी वेळीच पाऊल उचलण्याची मागणी होत आहे.
बोईसर, गुजरात आणि सेलव्हासा या औद्योगिक कारखान्यांच्या परिघात पालघर, डहाणू आणि तलासरी हे तालुके येतात. या कारखान्यातून दिवसागणिक मोठ्या प्रमाणावर घातक रसायनयुक्त पदार्थ बाहेर निघतात. प्रदूषण मंडळाच्या नियमांना बगल देत काही कारखान्यातून रासायनिक पदार्थ स्थानिक नदी-नाल्यात सोडल्याने जलचरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडतात. या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जलस्रोतांमध्ये घातक रसायन टाकल्याने मासे मृत झाल्याचे प्रकार वाढले आहेत. 8 जानेवारीला वरोली नदीपात्रात दापचरी रबर बोर्ड, टोलनाका आणि शिव मंदीर या भागातून अज्ञात वाहनातून रासायनिक द्रव पदार्थ पात्रात सोडल्याने जलस्रोत दूषित होऊन मासे आणि अन्य जीव मेले.
ही बारमाही नदी डहाणू आणि तलासरी तालुक्यातील विविध गावांमधून वाहत जाऊन समुद्राला मिळते. जिल्ह्यातील गोड्यापाण्यातील जलसाठ्यात कडवाली, दंडावन, मुरी, मल्या, शिवडा, गोडी वाव, कोलंबी हे मासे तसेच गोडी चिंबोरी इ. आढळतात. स्थानिक आदिवासी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून कुटुंबासाठी तर काहीजण मासे विकून चरितार्थ चालवतात. समुद्रातील माशांचे दर वाढल्याने गोड्यापाण्यातील मासे खूपच महत्वाचे आहेत. त्यांचा आहारात समावेश केल्याने विविध जीवनसत्त्वे मिळून पोषणाच्या समस्येवरही तोडगा निघतो.

 

मागील काही वर्षांमध्ये पालघर जिल्ह्यातील या घटनांमध्ये वाढ होऊन गोड्यापाण्यातील माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या, तरी त्यांच्या संवर्धनासाठी आतापर्यंत मत्स्यसंशोधन व संवर्धन केंद्राची निर्मिती झालेली नाही. बदलत्या ऋतूचक्रामुळे वेळेवर पाऊस न झाल्यास गोड्यापाण्यातील माशांच्या प्रजननकाळात नदी, ओढ्यांनी तळ गाठलेला असताना माशांच्या वृद्धीवर परिणाम होऊन अनेक जाती नष्ट झाल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. पाणी अडवण्यासाठी पात्रात आडवे बांधलेले सिमेंट बंधारेही अडसर ठरतात. तर औद्योगिक वसाहतीतून निघणारे घातक रसायने जलस्रोतात सोडल्याने लाखो मासे मारतात.

&……………………………………………………………………………………….

First Published on: January 19, 2023 9:33 PM
Exit mobile version