तुंबलेल्या गटारांनी घेतला मोकळा श्वास

तुंबलेल्या गटारांनी घेतला मोकळा श्वास

मान्सूनपूर्व कामांना चालना देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तुंबलेली गटारे साफसफाई करण्याच्या कामांना गती मिळाली. त्यामुळे अखेर सरावली ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील तुंबलेल्या गटारांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरवर्षाप्रमाणे सरावलीसह अवधनगर, धोंडीपुजा, संजयनगर, भैयापाडा परिसरातील सर्व गटारांची साफसफाई सुरु झाल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा नाल्यामध्ये होऊन वाहून जायला मदत होणार आहे. कोरोना काळात नालेसफाई करण्यास मजूर मिळत नसल्याने मोठी पंचायत होत आहे. म्हणूनच ग्रामपंचायत नालेसफाईचे काम स्वतः आपल्या स्तरावर काम करवून घेत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सुभाष किणी यांनी दिली.

वाढते नागरीकरणामुळे नागरी वस्तीमध्ये गटारे तुंबून पाण्याचा होणार निचरा थांबत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्या होत्या. यावेळी मान्सूनपूर्व गटार साफसफाईला सुरुवात करण्यात आली असल्याचे किणी यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागामार्फत या कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयक आणि सुरक्षा साहित्य उपलब्ध केले जात आहे. गटारात उतरून काम करण्यासाठी आवश्यक लागणारे सुरक्षा किट देण्यात येत आहेत. मान्सूनपूर्व कामांचा निपटारा वेळेत करण्यासाठी जलदगतीने कामे करावी लागत आहेत. कामांचा दर्जाही योग्य आहे. तरीही काही लोकांनी याबाबत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप यांच्याकडे तक्रार केली होती. आवश्यक असलेली कामे ग्रामपंचायतस्तरावर करण्यात आल्याने त्यात काहीही गैर नाही, असे सरपंच लक्ष्मी चांदणे यांनी सांगितले. गटाराच्या कामांमध्ये अनियमितता असल्याची तक्रार अवधनगरच्या काही लोकांनी केली होती. प्रत्यक्ष पाहणी करून गटार साफसफाई झाली आहे की नाही, याची पाहणी कोणीही खात्री करून घेऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –

तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लसीकरण दोन दिवसांसाठी बंद, मुंबई पालिकेचा मोठा निर्णय

First Published on: May 15, 2021 12:16 AM
Exit mobile version