आदिवासी दिन उत्साहात साजरा; विविध कार्यक्रमांतून संस्कृतीचे दर्शन

आदिवासी दिन उत्साहात साजरा; विविध कार्यक्रमांतून संस्कृतीचे दर्शन

जागतिक आदिवासी दिवस डहाणूत मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी तारपा चौकात आदिवासी बांधवांसोबत तारपा नृत्य करून या समाजाच्या सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहित केले. कोरोना नियमांचे पालन करून दिवसभर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यांतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन दिसून आले.

सकाळीच प्रकल्प कार्यालयाद्वारे ६६ आदिवासी मुलींना सायकलीचे मोफत वितरण करण्यात आले. डहाणू शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या तारपा चौकापर्यंत शेकडो आदिवासी बांधव तारपा नृत्य करत पोहचले. आगर, वडकून, आंबेसरी, धुंदलवाडी, साखरे, आशागड, उर्से येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या ९ पथकांनी नृत्य सादर केले. आदिवासींचे दैवत असलेल्या धरती आबा बिरसा मुंडा यांच्या तसबिरीला व तारपा नृत्यशिल्पास प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल, आमदार विनोद निकोले, नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी पुष्पांजली वाहिली. यावेळी स्वतः मित्तल यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे तारप्याच्या ठेक्यावर फेर धरून तारपा नृत्य केले. भारतीय प्रशासकीय सेवेतील एका उच्चपदस्थ अधीकारी महिलेने प्रथमच अशाप्रकारे नृत्य करून आदिवासींच्या सांस्कृतिक वारशाला अभिवादन करताना या दिवसाचा आनंद द्विगुणित केला. त्यामुळे आदिवासींच्या उत्साहात भर पडली.

पारनाका येथील के एल पोंदा हायस्कूलच्या दालनात आदिवासी समाजातील कला, संस्कृती, रानभाज्या, चिकूपासून विविध खाद्यपदार्थ निर्मिती, वारली चित्रकला, आदी १३ स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. प्रकल्प विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले हे प्रदर्शन १४ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. याद्वारे आदिवासी बचत गटांना लाभ होणार आहे. त्यानंतर ” तणावमुक्त आदिवासी जीवनशैली” या कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प कार्यालयात पार पडले. वसंत अंकारे यांनी आदिवासी समाजाच्या तणावमुक्त जीवनशैली आणि निसर्ग सानिध्यातुन मिळणारा आनंद याबद्दल मार्गदर्शन केले. मोखाडा तालुक्यातील खोडाळा शहरात आदिवासी दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी दिनाच्या दिवशी अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन शिवाजी चौक येथे माजी सभापती प्रदीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण सरपंच प्रभाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. आमदार सुनील भुसारा, जिप सदस्य प्रकाश निकम, जिप सदस्या कुसुम झोले, आशा झुगरे, तहसिलदार वैभव पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह गौरवण्यात आले.

वाडा तालुक्यात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी खण्डेश्वरी नाका येथे आदिवासी क्रांतिवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. खंडेश्वरी नाका ते  पंचायत समिती कार्यालय या दरम्यान अत्यंत साध्यापणाने रॅली काढण्यात आली. पंचायत समिती येथे संविधान स्तंभाला अभिवादन करून  रॅलीचे समापण करण्यात आले. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, डॉ.हेमंत सावरा, तालुका अध्यक्ष मंगेश पाटील, राष्ट्रवादीचे सुरेश पवार, अनंता वणगा, संतोष साठे, गणेश बाराठे, दिनेश पाठवा, कल्पेश  ठाणगे आदी यावेळी सहभागी झाले होते.

गिरीवासी सेवा मंडळ, कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी महाविद्यालय खोडाळा जोगलवाडी या महाविद्यालयाने जागतिक आदिवासी दिनानिमित्त ऑनलाईन पद्धतीने चर्चासत्र राबवून लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रश्न तुमचे, उत्तर आमचे, या कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली. या ऑनलाईन चर्चासत्राचे उद्घाटन मुंबई विद्यपीठाचे उपकुलसचिव दीपक वसावे यांच्या हस्ते करण्यात आले. जव्हार तालुक्याच्या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. युवा आदिवासी संघ यांच्यावतीने कोरोना योद्धांचा सत्कार आमदार सुनील भुसारा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांना मदत

जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा होत असताना एकलव्य आदिवासी क्रांतीदल आणि आदिवासी फाऊंडेशच्या पदाधिकाऱ्यांना आईवडिलांचे छत्र हरवलेल्या भावांना मदतीचा हात पुढे केला. विक्रमगड तालुक्यातील मोहू बुद्रुक या गावातील रुपेश आणि रोहन रडे या चिमुकल्या भावांचे आईवडिलांचे निधन झाल्याने ते पोरके झाले आहेत. याची माहिती मिळताच दोन्ही संस्थांचे पदाधिकारी सोमवारी त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी जीवनावश्यक वस्तूंसह कपडे आणि शैक्षणिक साहित्य रुपेश आणि रोहनला देण्यात आले. दोन्ही मुलांच्या पुढील शिक्षणाचा भार या संघटनांचे पदाधिकारी उचलणार आहेत. एकलव्य क्रांतिदलचे पालघर जिल्हाध्यक्ष पाटकर, सतेंद्र मतेरा, दीपक शेट्टी, आदिवासी फाउंडेशनचे गुरुनाथ सहारे, भूषण महाले, जयेश गावित, गुरुनाथ आघाणे, दादोडे काका, जितू दुमाडा, कृष्णा सहारे आदींनी दोन्ही भावांच्या कायम पाठिशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

हेही वाचा –

कर्नाटकातील मराठीबहुल गावे महाराष्ट्रात सामील करा; महापौरांचे मोदींना पत्र

First Published on: August 10, 2021 1:04 AM
Exit mobile version