मजूर महिला मरत होत्या,ठेकेदार गायब,इंजिनियर गायब, मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

मजूर महिला मरत होत्या,ठेकेदार गायब,इंजिनियर गायब, मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

वसई : विरार येथे इमारत बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी भिंत कोसळून तीन मजूर महिलांच्या मृत्युप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात बिल्डर, ठेकेदार आणि आर्किटेक्टविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरार पूर्वेकडील मनवेलपाडा रोडवर एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्याठिकाणी मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पंधरा फुटाची भिंत कोसळून पाच मजूर महिला ढिगार्‍याखाली दबल्या गेल्या होत्या. त्यातील साहूबाई अशोक सुळे (४५), लक्ष्मीबाई बालाजी गव्हाणे (४५) आणि राधाबाई एकनाथ नवघरे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मजूर महिला जखमी झाल्या असून त्यातील नंदाबाई अशोक गव्हाणे (३२) हिची प्रकृत्ती चिंताजनक आहे. याचारही महिला एकाच कुटुंबातील असून नांदेड जिल्ह्यातून मजुरीच्या कामासाठी आल्या होत्या.

घटना घडली त्यावेळी साईटवर ठेकेदार अथवा इंजिनियर कुणीही हजर नव्हते. ठेकेदाराचा फक्त एक सुपरवायझर जागेवर होता. ठेकेदाराने भिंत बांधताना योग्य ती काळजी न घेतल्याने ओल्या भिंतीला पाठीमागून माती भरावाचा दबाव आल्यानेच ती कोसळल्याचे मजुरांचा आरोप आहे. घटना घडल्यानंतर त्वरीत मदतही मिळाली नाही, असाही त्यांचा आरोप आहे. गव्हाणे कुटुंबियावर मोठा आघात झाला असून त्यांची लहान मुले वार्‍यावर पडली आहेत. त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, याप्रकरणी विरार पोलिसांनी बिल्डर चिराग जनक दोषी, ठेकेदार भरत सुरेश पटेल आणि आर्किटेक्त उमेश केंकरे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

First Published on: June 7, 2023 10:33 PM
Exit mobile version