… तर हे सरकार गडगडेल; अजित पवारांचं मोठं विधान

… तर हे सरकार गडगडेल; अजित पवारांचं मोठं विधान

राज्यातील शिंदे सरकारला जोवर 145 आमदारांचा पाठिंबा आहे तोवर चालेल, ज्यावेळी सरकारमधील आमदारांची संख्या कमी होईल त्यावेळी हे सरकार गडगडेल, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारबाबत केलं आहे. अजित पवार यांच्या हस्ते आज देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईतील राष्ट्रवादी भवनात ध्वजारोहण झाले, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभेत भाजप 48 पैकी 47 जागा जिंकणार असल्याचा दावा केला त्यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, सत्ताधारी पक्ष राज्यात 48 खासदारांपैकी 47 खासदार निवडून आणण्याची वक्तव्ये करत आहेत. अरे 47 कशाला 48 चे 48 निवडून आणणार म्हणा. म्हणायला काय जात? महाराष्ट्रात कधीही 48 चे 48 खासदार निवडून आल्याचा इतिहास नाही. मात्र उत्तर प्रदेशात 85 पैकी 85 खासदार निवडून आणल्याचा इतिहास आहे. पण महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात एकाच पक्षाचे संपूर्ण खासदार कधीच निवडून आलेले नाहीत. राज्यातील मतदार हा विचारी आहे, आगामी निवडणुकीत यासंबंधीचे चित्र मतदानानंतर स्पष्ट होईल.

हेही वाचा : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंचप्रण संकल्प घोषणा

राज्य सरकारमधील खातेवाटपाच्या प्रश्नावर अजितदादा म्हणाले की, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ अस्तित्वात आले, जे मुख्यमंत्री असतात त्यांच्या नावानेच सरकारला संबोधले जाते. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी आहेत. त्यामुळे शिंदे सरकार म्हटले जाते. फक्त युतीच्या काळात जोशी- मुंडे सरकार म्हटले जात होते. पण त्यानंतर असं म्हणण्याची पद्धत बंद पडली. कोणाला कोणते खाते द्यायचे हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. हे खातेवाटप करताना एखादे खाते हलके आणि जड असा भेद न करता महाराष्ट्रात काम करायचे असल्यास कोणत्याही खात्याच्या माध्यमातून काम करता येते. असही अजितदादांनी नमूद केले.


हेही वाचा : मुकेश अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, दहिरसरमधून एक संशयित ताब्यात

First Published on: August 15, 2022 2:04 PM
Exit mobile version