सूर जुळले : शिवसेनेत माकडांची तर, संघात गाढवांची होतात माणसे…

सूर जुळले : शिवसेनेत माकडांची तर, संघात गाढवांची होतात माणसे…

मुंबई : भाजपासोबत युतीमध्ये सडलो असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले असले तरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच शाखा असलेल्या भाजपा आणि शिवसेनेचे सूर अजूनही जुळत आहेत, हे नव्याने समोर आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची महती सांगताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य आणि पूर्वी भाजपामध्ये असलेल्या एकनाथ खडसे यांनी काही वर्षांपूर्वी संघाची महती सांगताना केलेले वक्तव्य यात बरेचसे साम्य आहे.

शिवसेनेची गेली २५ वर्ष भाजपासोबत युती होती. आपली ही वर्षं युतीमध्ये सडली, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. आता तर, शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर भाजपावरचा रोष आणखी वाढला आहे. २५ वर्षे एकत्र राहिलेल्या या दोन पक्षांतील दरी आता खूपच वाढली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे सातत्याने एकनाथ शिंदे गटावर तसेच भाजपावर टीका करत आहेत. आजही टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणसे केली. माणसांचे सरदार केले. याच सरदाराने शिवसेनेवर घाव घातले.’

हेही वाचा – मंकीपॉक्स रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स, वाचा…

तर दुसरीकडे, भाजपाचे बहुसंख्य ज्येष्ठ नेते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले आहेत. शनिवारी पनवेल येथे झालेल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संघाबद्दलच्या भावना व्यक्त करताना शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेनेकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर एकेरी भाषेत टीका करण्यात आली. संघ आमचा आई-बाप आहे, त्यांच्यावरची टीका आम्ही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.

अनेक वर्ष भाजपात राहिलेले आणि अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसे यांनी देखील २०१७मध्ये (भाजपात असताना) संघाची महती सांगितली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्त आणि यंत्रणेत एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो, असे त्यांनी जळगावमधील एका कार्यक्रमात म्हटले होते.

एकूणच माकड असो की गाढव, शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सान्निध्यात आला तर त्याचा माणूस होतो, असा या दोन नेत्यांच्या वक्तव्याचा मथितार्थ घेता येईल.

हेही वाचा – पश्चिम बंगालचा होतोय महाराष्ट्र ! तृणमूलचे ३८ आमदार भाजपच्या वाटेवर?

First Published on: July 27, 2022 9:33 PM
Exit mobile version