महाडमध्ये कचरा विघटन प्रक्रिया केंद्राला आग; मशिनरी जळून खाक, २५ लाखाचे नुकसान

महाडमध्ये कचरा विघटन प्रक्रिया केंद्राला आग; मशिनरी जळून खाक, २५ लाखाचे नुकसान

महाड: नगरपरिषदेच्या लाडवलीतील कचरा विघटन प्रक्रिया केंद्राला वणव्यामुळे आग लागल्याने या केंद्रातील कचरा तसेच कचरा प्रक्रियेच्या यंत्रसामग्रीचे सुमारे २६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही आग लागली होती. आगीवर नियंत्रण आणण्यास पालिका अग्निशमण दलाला यश आले.
शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असणार्‍या लाडवलीत नगरपालिकेचे ओला आणि सुका कचरा विघटन प्रक्रिया केंद्र आहे. या ठिकाणी कचर्‍याचे वर्गीकरण आणि विघटन करून कचर्‍याची विल्हेवाट लावली जाते. सुमारे पाच टन क्षमता असणार्‍या या प्रक्रिया केंद्राच्या एका युनिटला पहाटे साडेपाच वाजता आग लागली. शेजारच्या माळरानवर पेटत आलेला वणवा या प्रक्रिया केंद्रामध्ये शिरल्याने वर्गीकरण करून ठेवण्यात आलेला सुमारे तीन टन सुका कचर्‍याने आगीत पेट घेतला. कचरा पेटल्यानंतर ही आग वार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात वाढली आणि प्रक्रिया केंद्राच्या इतर भागात देखील पसरली कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या सुमारे तीन यंत्रसामग्री यामध्ये जळल्या.

पाच तासांनंतर विझली आग
पाच तासांनंतर ााग आटोक्यात कचरा विघटन प्रक्रिया केंद्रातील बेलिंग मशीन, स्टेनींग मशीन, प्लास्टिक क्रशर मशीन, मटेरियल रिकव्हरी फंक्शन या यंत्रणा आगीत जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे नगरपालिकेचे सुमारे २६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची घटना कळताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे अभियंता परेश साळवी, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख गणेश पाटील तसेच पालिकेच्या अग्निशामक दलाने या ठिकाणी तातडीने रवाना झाले. सुमारे पाच तास प्रयत्न करून ही आग विझविण्यात आली आहे.

First Published on: February 3, 2023 7:06 PM
Exit mobile version