रायगडमध्ये नद्यांना पूर पाचजण वाहून गेले

रायगडमध्ये नद्यांना पूर पाचजण वाहून गेले

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. पेण तालुक्यात बाळगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर आल्याने महामार्ग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे बराच कालावधीसाठी वाहतुक ठप्प झाली होती. पेण तालुक्यातील पुर परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय तट रक्षक दलाच्या एका तुकडीला पाचारण करण्यात आले.

दोन दिवसांपासून कोसळणार्‍या पावसामुळे म्हसळा, कर्जत, पनवेल-पोयंजे येथील तीघे जण तर खोपोली क्रांतीनगर येथील दोन लहान मुले वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांच्या मदतीने प्रशासनाने शोध कार्य हाती घेतले आहे. कर्जत येथील प्रमोद जोशी (26), पोयंजे येथील दिपक ठाकूर (24) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत, तर म्हसळा आणि क्रांतीनगर येथून वाहून गेलेल्यांची नावे समजू शकलेली नाहीत.

गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल 186 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे आंबा, कुंडलीका, बाळगंगा नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी घरात, रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. माणगाव-मोर्बा, नेरळ-माथेरान या ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दरड हटवण्याचे काम सुरू आहे. पनवेल तालुक्यातील 348 घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अलिबाग, पेण, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, महाड या ठिकाणी काही प्रमाणात घरे आणि गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

First Published on: July 20, 2021 5:33 AM
Exit mobile version