समाज घडविण्यासाठी शिवचरित्र वाचणे गरजेचे; संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

समाज घडविण्यासाठी शिवचरित्र वाचणे गरजेचे; संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

नागोठणे: तुळजा भवानी म्हणजेच भारतमाता असून छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजाभवानीशी एकरूप झाले होते. शिवाजी महाराजांवर अनेक नाटके आणि चित्रपट तयार झाले पण ते फक्त पैसे कमवण्याचे साधन म्हणूनच. यातून लोक कितपत जागे झाले?, असा प्रश्न करतानाच देव, देश आणि धर्मासाठी जगणारा, संपूर्ण देश छत्रपती ‘शिवाजी’ आणि ‘संभाजी महाराज रक्तगटा’चा आणि हिंदवी स्वराज्याचा दिवा काळजात लावणारा समाज आम्हाला निर्माण करायचा आहे. असा समाज घडविण्यासाठी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या शिवाय दुसरा मंत्र नाही, पण त्यासाठी शिवचरित्र वाचणे गरजेचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन संभाजी भिडे गुरुजी यांनी येथे केले.
ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नागोठणे विभागाच्यावतीने रविवारी भिडे गुरुजी यांच्या श्री शिवशंभू चरित्र, धारातीर्थ गटकोट मोहीम, श्री रायगडवर पुनर्स्थापित होणारे ३२ मण सुवर्ण सिंहासन, हिंदवी स्वराज्य खडा पहारा आदींविषयांवर आधारित व्याख्यानात ते बोलत होते.
जिथे जिथे हिंदवी स्वराज्याचा हुंकार आहे, तिथे अशरीर रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्तित्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नव्हते. तर ते राष्ट्र आणि धर्म यासाठी लढले. अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले गेले, त्यांचे कधी, कोण दर्शन घेतो काय? असे प्रश्नही उपस्थित केले.हिंदू समाज टिकवायचा असेल तर यावर एकच उपाय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा मंत्र; त्याची उपासना करणे गरजेचे असून प्रत्येकाने शिवचरित्राचे वाचन केले पाहिजे. महाराष्ट्रात मोर्चे काढून ‘लव्ह जिहाद’ संपणार नाही तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अवलंबलेला उपाय हाच हा रोग मुळासकट नष्ट करणारा रामबाण औषध असल्याचे विधान भिडे गुरुजी यांनी केले. व्याख्यानाची सांगता श्लोक पठणांनी झाली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नागोठणे विभागाचे अध्यक्ष,पदाधिकारी, धारकरी यांनी मेहनत घेतली.
दरम्यान, भिडे गुरुजींनी मनसे नेते गोवर्धन पोलसानी यांच्या निवासस्थानी तसेच नागोठणेतील धारकर्यांच्या होळीचा माळ येथे असलेल्या श्री शिव स्मारकाला रात्री भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे श्लोकपठण करून दर्शन घेतले यावेळी धारकर्यांसह शहर व आळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 २८ जानेवारीपासून गडकोट मोहीम
अतिशय शिस्त बद्ध झालेल्या या व्याख्यानात भिडे गुरुजी यांनी येत्या २८जानेवारी ते १ फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येणार्‍या गडकोट मोहीमेबाबत माहिती दिली. सदर मोहिमेत सहभागी होणार्‍या सर्व धारकरींनी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता श्री भीमाशंकर येथे पोहोचावे. मोहिमेची सुरुवात रविवारी, २९ रोजी पहाटे ५.३० वाजता श्री तुळजामातेच्या आरतीने होणार असून सदरील मोहिम श्रीवरसुबाई मार्गे श्रीशिवनेरी येथे बुधवारी, १ फेब्रुवारी रोजी आल्यानंतर मोहिमेचा समारोप होणार असल्याचे त्यांनी सागितले.

First Published on: January 17, 2023 9:57 PM
Exit mobile version