आंबे, करवंदे, जांभळे; श्रीवर्धनमध्ये रानमेव्याला मागणी

 आंबे, करवंदे, जांभळे; श्रीवर्धनमध्ये रानमेव्याला मागणी

श्रीवर्धन:  येथील बाजारपेठेत रानमेव्याची आवक मुबलक प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मार्च महिना सुरू झाल्यानंतर ओले काजूगर, काजूची फळे, पिकलेले आंबे, करवंदे, जांभळे, पांढरे जांभ, लाल जांभ, कच्च्या कैर्‍या, रांजणाची फळे बाजारपेठेत विक्रीसाठी आलेली दिसून येतात. यामध्ये सर्वात जास्त मागणी ओल्या काजूगारांना असते. कारण ओल्या काजूगरांची भाजी अतिशय रुचकर होते. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये देखील ओले काजूगर घातले जातात. तसेच चिकन किंवा मटण बनवताना त्यामध्ये देखील ओले काजूगर चविष्ट लागतात. चिकन किंवा मटन बिर्याणी बनवताना त्यामध्ये देखील ओल्या काजूची चव एक वेगळीच लागून जाते.
तालुक्यातील आदिवासी बांधव, भगिनी ओले काजूगर त्याचप्रमाणे काजूची फळे, करवंदे, जांभळे, रांजणाची फळे इत्यादी विक्रीसाठी आणत असतात. सदर रानमेव्याची विक्री करून त्यांना फायदा देखील मोठ्या प्रमाणात होतो. कारण ओले काजूगर प्रति शेकडा दीडशे ते दोनशे रुपयांनी विकले जातात. तर काही वेळेला हा भाव २५० रुपयापर्यंतही जातो. सध्या पिकलेले हापूस आंबे देखील बाजारात तीनशे ते साडेतीनशे रुपये डझननी विकले जात आहेत.
करवंदे, जांभळांना मागणी
रानमेव्याची खरेदी करताना ग्राहकांचा कल मात्र डोंगरची काळी मैना म्हणून ओळखली जाणारी करवंदे व जांभळे खरेदी करण्याकडेच जास्त असल्याचे पाहायला मिळते. जांभळाची फळे खाल्ल्याने मधुमेह कमी होतो असे बोलले जाते. तसेच जांभळाच्या बिया सुखवून त्याची पावडर देखील मधुमेहावरती औषध म्हणून वापरली जाते. त्यामुळे जांभळाच्या फळांना मागणी देखील मोठ्या प्रमाणावर आहे व प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये इतका भाव देखील जांभळाच्या फळांना मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वच रानमेव्याचे भाव वाढलेले दिसत आहेत.

First Published on: May 4, 2023 10:08 PM
Exit mobile version