जुन्याच पुस्तकांवर विद्यार्थ्यांची मदार

जुन्याच पुस्तकांवर विद्यार्थ्यांची मदार

प्रातिनिधीक फोटो

गेले दोन वर्षे शाळा घरीच भरली जात असली तरी शैक्षणिक वर्षातील पाठ्यपुस्तके अद्याप शाळांनाच पुरवठा न झाल्याने विद्यार्थ्यांकडून जमा केलेल्या जुन्याच पुस्तकांवर विद्यार्थ्यांची शैक्षणिक मदार असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनामुळे शाळेचे वेळापत्रक बिघडले असून, विद्यार्थ्यांनी दोन वर्षांत शाळेचे तोंड पाहिलेले नाही. मिळणारी पुस्तके आणि मोबाईलवरील धडे यातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. यावर्षी काही अंशी शिथिलता असली तरी शाळा कधी सुरू होतील याबाबतचा निर्णय कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घेता येत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे शैक्षणिक वर्षाचे मात्र तीनतेरा वाजत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव यावर्षी देखील कायम असल्याने सन २०२० ते २०२१ हे शैक्षणिक वर्ष काही दिवसांपूर्वी सुरू झाले असले तरी मुलांना मात्र शालेय पाठ्यपुस्तके अद्याप मिळालेली नाहीत. गतवर्षी विद्यार्थ्यांकडून जमा केलेली पुस्तके यावर्षी मुलांना वाटप करण्यात आली असून, या पुस्तकांवरच यावर्षीचे शिक्षण अवलंबून आहे.

तालुक्यात एकूण ३०८ प्राथमिक शाळा आहेत. या सर्वच शाळा ग्रामीण भागात आहेत. ज्या गावातून इंटरनेट उपलब्ध होते अशा ठिकाणी मुलांचा अभ्यास मोबाईलवर सुरू आहे. मात्र ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी मात्र शालेय पाठ्यपुस्तकांवर अवलंबून राहावे लागत आहे. जवळपास १५० डिजिटल शाळा आहेत. मात्र शाळेत विद्यार्थीच येत नसल्याने आणि इंटरनेट नसल्याने ही सेवा देखील निरुपयोगी ठरत आहे. मोबाईलवर पीडीएफ पद्धतीने पुस्तके देण्यात येतात. मात्र इंटरनेटच्या वाढलेल्या वापरामुळे ही डिजिटल पुस्तके देखील सहज डाऊनलोड होत नाहीत.

यामुळे निम्म्याहून अधिक शाळेतील मुलांना डिजिटल शिक्षण आणि सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणापासून देखील वंचित राहावे लागत आहे. खासगी शाळांनी जमा केलेल्या पुस्तकांचे वाटप चालू करण्यात आले आहे. मात्र विद्यार्थ्यांकडे गेलेली अनेक पुस्तके फाटलेली आणि मळकट झाली आहेत. मात्र अन्य पर्याय मुलांपुढे नसल्याने याच पुस्तकांवर अभ्यास सुरू झाला आहे.

अद्याप शिक्षण विभागाकडे नवीन शालेय पुसतके उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे सध्या तरी जुन्या पुस्तकांचे वाटप शालेय पातळीवर केले जात आहे.
-अरुणा यादव, गट शिक्षणाधिकारी, महाड

First Published on: June 19, 2021 7:43 PM
Exit mobile version