दिवेआगरच्या सुवर्ण गणेश स्थापनेचा मार्ग मोकळा

दिवेआगरच्या सुवर्ण गणेश स्थापनेचा मार्ग मोकळा

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, बुधवारी ऐन संकष्ट चतुर्थीला ही खूशखबर मिळाल्याने गणेशभक्त कमालीचे आनंदले आहेत. 17 नोव्हेंबर 1997 रोजी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कै. द्रौपदीबाई धर्मा पाटील यांच्या बागायतीमध्ये खोदकाम करताना एका तांब्याच्या पेटीमध्ये सोन्याच्या गणपती मुखवट्यासह इतर सुवर्णालंकार सापडले होते. त्यांनी ते सर्व ग्रामस्थांच्या ताब्यात दिले. भारतीय निखात निधी अधिनियम 1978 च्या तरतुदीनुसार हा सर्व ऐवज सरकारी मालकीचा ठरविण्यात आला आणि पुढे जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने 14 जानेवारी 1998 रोजीनंतर या मूर्तीची गणपती मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिरात चोख सुरक्षा व्यवस्था असतानाही 23 मार्च 2012 रोजी सुरक्षा रक्षकांची हत्या करून सुवर्ण गणेश मुखवट्यासह दागिन्यांची चोरी झाली. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींनी तत्पूर्वी गणेश प्रतिमेचे तुकडे करून त्याच्या लगड तयार केल्या होत्या. पोलिसांना 1361 ग्रॅम लगड मिळविण्यात यश आले.

मिळालेले सोने परत करावे यासाठी देवस्थान विश्वस्तांनी अलिबाग न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र मुखवटा अस्तित्वात नसल्याने ते देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर श्रीवर्धनचे उप विभागीय अधिकरी अमित शेडगे यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. बुधवारी 31 मार्च रोजी न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सरकार तर्फे करण्यात आलेली विनंती मान्य करून त्याच सोन्याचा वापर करून गणपतीचा मुखवटा तयार करण्याची परवानगी न्यायालयाने दिली.

हेही वाचा – 

गुजरात विधानसभेत ‘लव्ह जिहाद’ विधेयकाला मंजूरी; १० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद

First Published on: April 2, 2021 3:28 PM
Exit mobile version