पोलादपुरावर पुराचे सावट कायम!; नद्यांवर धरणे बांधण्याची जनतेची मागणी

पोलादपुरावर पुराचे सावट कायम!; नद्यांवर धरणे बांधण्याची जनतेची मागणी

 बबन शेलार/ पोलादपूर

पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड, पोलादपूर तालुक्यात महापूर आणि भूस्खलनाच्या झालेल्या घटनांमुळे ‘प्रचंड’ हा शब्द तोकडा पडेल, अशी अपरिमित हानी झाली आहे. स्वाभाविक या दोन्ही तालुक्यात नदीच्या पात्रात गाळ उपशाचा प्रकार महापूर रोखण्याकरीता शासनामार्फत केला जात आहे. मात्र नदी पात्रातील गाळ काढून सलग धो-धो कोसळत पाऊस पडत राहिला तर पूर किंवा महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणे थोपविता येईल का, अशी साशंकता जनतेकडून व्यक्त होत असून, सावित्री नदीला पावसाळ्यात येणार्‍या पुराची समस्या ऐरणीवर आली आहे.
महाबळेश्वर येथील गाय मुखातून पंचनद्यांचा उगम झाला आहे. यापैकी सावित्री नदी खाली उतरली असून, तालुक्यातून वाहत महाडच्या दिशेने जाते. यावेळी खोर्‍यातून वाहणार्‍या ढवळी आणी कामथी या नद्यांसह घोडवणी अशा तीन नद्या रानबाजीरे धरणा अगोदर पावसाळ्यात सावित्री नदीला मिळतात. त्यामुळे सलग दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस पडला तर सावित्री नदीचा प्रवाह दोन्ही काठांना धुडकावत वाहत असतो. परिणामी मोठ्या प्रमाणावर धरणाला धोका पोहचू नये याकरीता पाण्याच्या विर्सग केला जातो. विर्सगाच्या पाण्याच्या प्रवाहात दक्षिणेकडील पळचिल आणि क्षेत्रफळ कोतवाल यासारख्या १८ गावांच्या परिसरातून छोट्या नद्या, ओढे, वहाळयातून वाहून येणारे पाणी चोळई गावाजवळ एकत्र येत सावित्री नदीला मिळतात आणि या नदीला पूर येऊन प्रवाहाचे पाणी शहरातील विविध भागांतून घुसते. वास्तविक रानबाजीरे धरणाच्या पाण्याचा कोणताही आणि कसलाही उपयोग पोलादपूरकरांना होत नाही. हे धरण केवळ महाडच्या बिरवाडी येथील औद्योगिक क्षेत्र विकास, वसाहतीकरिता बांधले आहे.
देवळे परिसरात डोंगरमाथ्यावरून वाहून येणार्‍या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाचे रुपांतर ओढ्यात होत. पुढे देवळे गावाच्या पायथ्याशी सावित्रीच्या प्रवाहाला मिळते. याच ओढ्यावर देवळे गावाच्या उशाला लघु बंधारा बांधण्यात आला आहे. याला पहिल्या पावसापासून गळतीचा आजार असल्याने उन्हाळ्यात या बंधार्‍यात पाण्याचा थेंबही राहात नाही. सावित्रीच्या प्रवाहात मिसळणार्‍या ढवळी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला बोरज, साखर या गावाच्या हद्दीत धरण बांधण्यात आले तर साखर, बोरज, साळवी कोंड, उमरठ गावाचा खालचा भाग, तळ्याची वाडी या गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहणार्‍या ढवळी नदीच्या प्रवाहाचे पाणी निर्माण केलेल्या जलाशयात संचय करता येणार असून, पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होईल. अंदाजे १९७६ सालाच्या दरम्यान साखर, बोरज धरण प्रकल्प राबविण्यात येणार होता, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी आणि ग्रामस्थांकडून मिळते. हा प्रकल्प झाल्यास रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊन स्थलांतर थांबण्यास मदत होईल.

घोडवणी नदीवर धरणाचे काम सुरू
कामथी नदीवर वडघर, बोरघर, कामथे या गावांच्या परिसरात माती परिक्षण करण्यात आले होते. भरत चोरगे आणि तुकाराम केसरकर आदी कार्यकर्त्यांसह गाव बैठका झाल्या होत्या. या परिसरात कामथी नदीवर धरण बांधून पावसाळ्यात कामथी नदीच्या प्रवाहाला नियंत्रणात आणता येईल, असे केसरकर आणि ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. सद्यःस्थितीत घोडवणी नदीवर किनेश्वरगाव हद्दीत धरणाचे काम सुरू असून, येत्या काही वर्षांत काम पूर्ण होईल. त्यामुळे येथे घोडवणी नदीच्या प्रवाहाला काही प्रमाणावर अटकाव झाला आहे. दक्षिणेकडील १८ गावांपैकी गोळेगणी येथे बंधार्‍याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र धामणदेवी येथे लघु बंधारा झाला तर त्याचा फायदा चोळई नदीच्या जोरदार प्रवाहाचा वेग कमी होणार असल्याने पोलादपूरच्या सीमेवर सावित्रीच्या प्रवाहात मिसळताना पूरस्थिती उद्भवणार नसल्याचे बुजुर्ग सांगतात.

नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी व्हावा
रानबाजीरे धरणापूर्वी पोलादपूर, चरई, लोहारे, दिविल, पारले, सवाद, माटवण, हावरे या गावांना सावित्री नदीचे पाणी उपलब्ध होत असे. मात्र धरण उभारणीनंतर पोलादपूरसह १० गावांना दरवर्षी सावित्रीच्या प्रवाहाच्या तडाख्याला सामोरे जावे लागून अतोनात नुकसान सहन करावे लागते आहे. या गावांनी मागील महापुरांमध्ये आपले सर्वस्व गमावले आहे. परिणामी पूरस्थिती निर्माण होऊ नये, गावे पावसाळ्यात पुराच्या भयातून मुक्त व्हावीत यासाठी रामबाजीरे धरणासारखी धरणे बांधुन पावसाळ्यात नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी किंवा नियंत्रित करणे अत्यावश्यक आणि महत्त्वाचे ठरले आहे.

First Published on: May 29, 2023 10:18 PM
Exit mobile version