पावसाळ्यापूर्वी खोपोली-पाली मार्ग होणार सुसाट

पावसाळ्यापूर्वी खोपोली-पाली मार्ग होणार सुसाट

चार वर्षांपासून प्रवाशांची डोकेदुखी ठरलेल्या खोपोली-पाली राज्य मार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार असल्याचा निर्धार नवीन ठेकेदार कंपनी विनफिटने व्यक्त केला आहे. काम वेळेत झाले तर या मार्गावरून प्रवास सुसाट होऊन वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.

श्री वरद विनायक नगरी महड आणि श्री बल्लाळेश्वर नगरी पाली या दोन अष्टविनायक तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाला, तसेच विळे-भागाड मार्गे पुण्याला जोडलेला हा राज्य मार्ग असल्याने कायम वर्दळीने व्यस्त असतो. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम 2016-17 मध्ये सुरू झाले होते. सुरुवातीला वन विभागाच्या परवानगीमुळे आणि नंतर ठेकेदारांना वेळेवर झालेल्या कामाचे पैसे वेळेत न मिळाल्याने रस्त्याचे काम रडतखडत सुरू होते. वर्षभरात तर कोरोनामुळे काम जवळपास ठप्पच झाले होते. पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे जिकरिचे बनले होते.

अगोदरच्या ठेकेदेराने केलेल्या कामाच्या दर्जाबाबत देखील शंका उपस्थित होत होत्या.अखेर नोव्हेंबर 2020 मध्ये नवीन ठेकेदार नेमण्याचा निर्णय शासनाने घेत विनिफिट टेक्नोकडे काम सोपविण्यात आले. मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या महानगरातील कामाच्या प्रदीर्घ अनुभवावर 22 किलोमीटर मार्गात अर्धवट कामे चार महिन्यातच नव्या ठेकेदाराने पूर्ण करीत कामाला गती दिली आहे. जागोजागी असलेले मातीचे ढिगारे, पूल आणि मोरीच्या अर्धवट राहिलेल्या कामामुळे वाहतुकीला त्रास आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करीत वेगात काम सुरू आहे. स्थानिक ठेकादारामार्फत आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरत काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

खोपोली ते पाली या 40 किलोमीटर मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम आहे. 2016-17 साली 190 कोटी रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु दोन ठेकेदारांनी अर्धवट काम करून अंग काढून घेतल्याने पुन्हा नव्याने ठेकेदार नेमण्यात आला. उर्वरित कामासाठी 120 कोटी निधी मंजूर आहे. वन विभागाची जमीन असल्यामुळे आवश्यक परवानगी उशिरा मिळत गेल्याने कामाला हवी तशी गती मिळाली नव्हती.

रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लागणे आवश्यक आहे. लाल मातीमुळे रस्ता चिखलमय होतो. या भागात कारखाने वाढत असून, अवजड वाहतूक देखील वाढली आहे. काँक्रिटीकरण आणि रूंदीकरण यामुळे भविष्यात प्रवास सुसह्य होईल.
-संदीप ओव्हाळ, खोपोली

पाली-खोपोली रस्त्याचे काम कोरोना काळातच नोव्हेंबर महिन्यात हाती घेतले होते. या दरम्यान रस्त्याची पाहणी केल्यावर तुकड्यांमध्ये अर्धवट काम असल्याचे निदर्शनास आले. मनुष्यबळही कमी प्रमाणात असतानाच स्थानिक निवडक ठेकादार यांच्या सहकार्याने काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
-समीर जयधे, व्यवस्थापकीय संचालक, विनफिट टेक्नो

First Published on: March 7, 2021 9:59 PM
Exit mobile version