बारसूमध्ये भाजपा आमदाराची 18 एकर जमीन, यावर सोमय्या काही बोलणार का? – सुषमा अंधारे

बारसूमध्ये भाजपा आमदाराची 18 एकर जमीन, यावर सोमय्या काही बोलणार का? – सुषमा अंधारे

महाड : महाड येथील चांदे क्रिडांगणावर शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर सभा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडत आहे. या सभेत बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी सभेची सुरूवात केली. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यावर हल्लाबोल करताना त्या म्हणाल्या की, आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांची 18 एकर जमीन आहे, यावर किरीट सोमय्या (kirit somaiya) काही बोलणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, बारसूमध्ये पूर्वी जमीन काही लाखांमध्ये विकत घेतल्या, त्या जमीनीला सोन्याचा भाव झाला असून त्या विकत घेतल्या जात आहेत. गुप्ता नावाचा अधिकारी ज्यांची 92 एकर जमीन बारसूमध्ये आहे, यावर किरीट सोमय्या कधी बोलणार आहेत, त्यांना काही प्रश्न विचारावे लागतील. त्याच बारसूमध्ये आमदार आशिष देशमुख यांची 18 एकर जमीन आहे, यावर किरीट सोमय्या काही बोलणार आहेत का? कोकण सारख्या ठिकाणी मच्छीमारी करणाऱ्यांची नावे कदम, सावंत किंवा जाधव अशी आडनावे मी समजू शकते, परंतु झवेरी, शर्मा, गुप्ता अशी आडनावे कधीपासून आली. बारसू जेवढ्या लोकांच्या जमीनी विकत घेतल्या आहेत, त्या सर्वांची आडनावे अमराठी कशी काय आहेत. या अमराठी अडनावांनी जर भूमीपुत्र असणाऱ्या कोकणवासीयांना हुसकावण्याचा चंग बांधला असेल तर ही आपली जबाबदारी असेल. कोकणवासियांच्या बाजूने ठामपणे उभे राहावे लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमचं हिंदुत्व दंगली करून घरे पेटवणारं हिंदुत्व नाही
उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) प्रकल्पातील प्रत्येकाला आपण तुमच्या लढ्यात सोबत आहोत याचा विश्वास दिला आहे. कारण आमचं हिंदुत्व दंगली करून घरे पेटवणारं हिंदुत्व नाही, आमचं हिंदुत्व लोकांना रोजीरोटी देऊन त्यांच्या चुली पेटवणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व डोळ्याला पाणी नम नम करणारं हिंदुत्व नाही, तर डोळ्याचं पाणी पुसणारं हिंदुत्व आहे,” असेही अधारे यावेळी म्हणाल्या.

नारायण राणे त्यांच्या मालकाने दिलेलं काम करतायत
राणे कुटुंबाबद्दल बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की, राणे साहेबांच्या दोन्ही पोरांना सीरियस घ्यायची मला गरज वाटत नाही. मुळात राणे साहेबांनाच सीरियस घ्यायची गरज नाही. त्यांना त्यांच्या मालकाने काम दिलेलं आहे आणि ते करत असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

First Published on: May 6, 2023 7:18 PM
Exit mobile version