स्टोक्स कर्णधार म्हणून नक्कीच यशस्वी होईल – सचिन तेंडुलकर

स्टोक्स कर्णधार म्हणून नक्कीच यशस्वी होईल – सचिन तेंडुलकर

बेन स्टोक्स

बेन स्टोक्स इंग्लंडचा कर्णधार म्हणून नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केला. कोरोनामुळे मार्चपासून क्रिकेट बंद होते. मात्र, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात झाली. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट खेळत नसून त्याच्या जागी स्टोक्स इंग्लंडचे नेतृत्व करत आहे. कर्णधार म्हणून स्टोक्स कितपत यशस्वी होईल याबाबत मागील काही दिवसांत बरीच चर्चा होत आहे. परंतु, स्टोक्समध्ये नियंत्रित आक्रमकता असल्याने तो नक्कीच यशस्वी होईल असे सचिनला वाटते.

नियंत्रित आक्रमकता सर्वोत्तम निकाल देतात

स्टोक्स स्वतः चांगली कामगिरी करून इतर खेळाडूंसमोर आदर्श ठेवेल. त्याने याआधीही इंग्लंडला एकहाती सामने जिंकवून दिले आहेत. तो आक्रमक वृत्तीचा आहे आणि सकारात्मक विचार करतो. मात्र, संघाच्या हितासाठी सावधपणे खेळण्याचीही त्याची तयारी असते. नियंत्रित आक्रमकता तुम्हाला सर्वोत्तम निकाल देतात असे मला नेहमी वाटते. स्टोक्सला मी जेव्हाही खेळताना पाहिले आहे, तेव्हा तो आक्रमकपणे खेळतो. मात्र, त्याचे स्वतःवर नियंत्रण आहे. त्यामुळे तो कर्णधार म्हणून नक्कीच यशस्वी होईल, असे सचिन म्हणाला.

मानसिकदृष्ट्या खूप कणखर

स्टोक्सने मागील काही वर्षांत बरेच चढ-उतार पाहिले आहेत. काही वर्षांपूर्वीचा काळ त्याच्यासाठी अवघड होता. परंतु, तो त्यातून ज्याप्रकारे बाहेर पडला, ते कौतुकास्पद आहे. तो मानसिकदृष्ट्या खूप कणखर आहे. मी त्याला पहिल्यांदा पाहिले होते, तेव्हाच मला समजले होते की, इयन बोथम, अँड्र्यू फ्लिंटॉफ यांच्यानंतर इंग्लंडचा सर्वोत्तम अष्टपैलू बनण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, असेही सचिनने सांगितले.

First Published on: July 9, 2020 1:30 AM
Exit mobile version