स्मिथची कोहलीशी तुलना होऊच शकत नाही – पीटरसन

स्मिथची कोहलीशी तुलना होऊच शकत नाही – पीटरसन

विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ७३ सामन्यांत तब्बल ६२.८४ च्या सरासरीने ७२२७ धावा केल्या आहेत. मात्र, हे आकडेही त्याची भारताचा कर्णधार विराट कोहलीशी तुलना करण्यासाठी पुरेसे नाहीत असे इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनला वाटते. धावांचा पाठलाग करताना कोहलीने जी कामगिरी केली आहे, ते लक्षात घेता स्मिथ त्याच्या आसपासही नाही असे पीटरसनने सांगितले. तो झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू पॉमी एमबांग्वाशी इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून बोलत होता.

स्मिथ आणि कोहली यांच्यापैकी सर्वोत्तम फलंदाज कोण असे पॉमीने विचारले असता पीटरसन म्हणाला, कोहली. मला यासाठी फार विचारही करावा लागला नाही. धावांचा पाठलाग करताना कोहलीने जी कामगिरी केली आहे, त्याने जितके सामने भारताला जिंकवून दिले आहेत, तसेच त्याच्यावर सतत जितका दबाव असतो ते लक्षात घेता, स्मिथ त्याच्या आसपासही नाही. स्मिथ आणि कोहलीची तुलना होऊच शकत नाही.

तसेच सचिन तेंडुलकर आणि कोहलीपैकी तू कोणाची निवड करशील या प्रश्नाने उत्तर देताना पीटरसन म्हणाला, पुन्हा मी कोहलीचेच नाव घेईन. धावांचा पाठलाग करताना तो ८० च्या सरासरीने धावा करतो आणि त्याने जवळपास सर्व एकदिवसीय शतके ही धावांचा पाठलाग करताना केली आहेत. तो सातत्याने भारताला सामने जिंकवून देतो. त्याची हीच गोष्ट खास आहे. मी किती सामानावीराचे पुरस्कार मिळवले, याचाच मी विचार करायचो. मी कशा पद्धतीने किंवा कशा शैलीत खेळलो, हे माझ्यासाठी कधीच महत्त्वाचे नव्हते. तुम्ही तुमच्या संघाला किती सामने जिंकवता आणि किती वेळा सामानावीराचा पुरस्कार पटकावता, यावरुन तुम्ही किती चांगले खेळाडू आहात हे कळते. कोहली सातत्याने भारताला सामने जिंकवून देत आहे. त्याचे आकडे फारच उत्कृष्ट आहेत.

विराटची दमदार कामगिरी 

काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सनेही कोहलीची स्तुती केली होती. त्यानेही सचिन आणि कोहली यांच्यात कोहलीची निवड केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके झळकावणारा कोहली सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० हून अधिकच्या सरासरीने धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. स्मिथची कसोटीतील कामगिरी ही कोहलीपेक्षा सरस असली, तरी टी-२० आणि खासकरुन एकदिवसीय क्रिकेट कोहलीची कामगिरी फारच अप्रतिम आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५९.३३ आणि टी-२० क्रिकेटमध्ये ५०.८० च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

 

First Published on: May 17, 2020 2:00 AM
Exit mobile version