भारत फायनलमध्ये प्रवेश करण्यात ‘यशस्वी’ 

भारत फायनलमध्ये प्रवेश करण्यात ‘यशस्वी’ 

भारत फायनलमध्ये प्रवेश करण्यात 'यशस्वी' 

यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर १० विकेट राखून मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात पाकिस्तानचा डाव अवघ्या १७२ धावांवर आटोपला असून भारताने १७३ धावांचे लक्ष्य अवघ्या ३५.२ षटकांत गाठले आहे. मुंबईकर सलामीवीर यशस्वी जैस्वालने ११३ चेंडूत ८ चौकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद १०५ धावांची खेळी केली. त्याला दिव्यांश सक्सेनाना नाबाद ५९ धावा करत उत्तम साथ दिली. आता अंतिम फेरीत भारताचा सामना बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील विजेत्याशी होईल.

मिश्राच्या ३ विकेट्स 

उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. त्यांची २ बाद ३४ अशी अवस्था होती. मात्र, सलामीवीर हैदर अली आणि कर्णधार रोहेल नझीर यांनी ६२ धावांची भागीदारी करत पाकिस्तानचा डाव सावरला. अखेर हैदरला ५६ धावांवर यशस्वीने बाद करत ही जोडी फोडली. कर्णधार नझीरने मात्र चांगला खेळ सुरू ठेवत आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु, त्याला मोहम्मद हॅरिस (२१) वगळता इतरांची फारशी साथ लाभली नाही. त्यालाही ६२ धावांवर डावखुरा वेगवान गोलंदाज सुशांत मिश्राने माघारी पाठवले. त्यामुळे पाकिस्तानचा डाव १७२ धावांवर आटोपला. भारताच्या मिश्राने ३, तर लेगस्पिनर रवी बिष्णोई आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

First Published on: February 4, 2020 8:01 PM
Exit mobile version