२०१९ वर्ष ठरले आव्हानात्मक!

२०१९ वर्ष ठरले आव्हानात्मक!

मागील वर्ष माझ्यासाठी आव्हानात्मक होते, पण मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, असे विधान भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने केले. कुलदीपने २०१७ ते २०१९ च्या सुरुवातीच्या काही महिन्यांपर्यंत भारताकडून अप्रतिम कामगिरी केली होती. मात्र, आयपीएल स्पर्धा आणि त्यानंतर विश्वचषकात त्याने निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे त्याला काही महिने भारतीय संघाबाहेर रहावे लागले होते. मात्र, यंदा तो अधिक मेहनत घेत चांगली कामगिरी करण्यास सज्ज आहे.

मागील वर्ष (२०१९) माझ्यासाठी आव्हानात्मक होते, पण मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मी अजून चांगल्याप्रकारे योजना आखल्या असत्या, माझ्या गोलंदाजीचा जास्त विचार केला असता, तर कदाचित मला जास्त यश मिळाले असते. आता २०२० वर्षात मी या गोष्टींमध्ये सुधारणा करेन. पुढील सामन्यासाठी योजना आखताना तुम्ही पुरेसा वेळ घेतला पाहिजे. मी आता गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांच्या मार्गदर्शनात नेट्समध्ये अधिक सराव करणार आहे. तसेच व्हिडीओची मदत घेत मी प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाचे कच्चे दुवे आणि भक्कम बाजू अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येकाला कुलदीप कशी गोलंदाजी करतो हे माहित आहे. त्यामुळे मला गोलंदाजीत विविधता आणावी लागेल, असे कुलदीपने सांगितले.

First Published on: January 10, 2020 2:04 AM
Exit mobile version