ऑस्ट्रेलियाविरुद्धची २४१ धावांची खेळी सचिनच्या कारकिर्दीतील सर्वात शिस्तबद्ध!

ऑस्ट्रेलियाविरुद्धची २४१ धावांची खेळी सचिनच्या कारकिर्दीतील सर्वात शिस्तबद्ध!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००४ साली सिडनीमध्ये केलेली २४१ धावांची खेळी ही सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात शिस्तबद्ध खेळी होती, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने व्यक्त केले. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असंख्य विक्रम केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिनच्या नावे आहे. त्याने २०० कसोटी सामन्यांत ५३.७८ च्या सरासरीने १५,९२१ धावा केल्या, ज्यात ५१ शतकांचा समावेश होता. मात्र, सचिनने सिडनीमध्ये केलेली ती खेळी सर्वात अविस्मरणीय होती, असे लाराला वाटते.

सचिन हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. आयुष्यात कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी शिस्त किती महत्त्वाची आहे, हे आपण सर्वजण त्याच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नाबाद २४१ धावांच्या खेळीतून शिकू शकतो. वयाच्या १६ व्या वर्षी पदार्पण करणारा खेळाडू पुढे २४ वर्षे कसोटी क्रिकेट खेळतो याचा तुम्ही विचार तरी करु शकता का? हे फारच अविश्वसनीय आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट खेळी केल्या. मात्र, सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (एससीजी) केलेली नाबाद २४१ धावांची खेळी ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वात शिस्तबद्ध आणि जिद्दीने केलेली खेळी होती, असे लारा आपल्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हणाला. सचिनने दुसर्‍या डावातही नाबाद ६० धावांची खेळी केली होती. मात्र, तो सामना अनिर्णित राहिला.

…म्हणून ती खेळी होती खास!
सचिनने २००४ साली सिडनीत झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात ४३६ चेंडूत ३३ चौकारांच्या मदतीने नाबाद २४१ धावांची खेळी केली होती. हा या मालिकेतील चौथा कसोटी सामना होता. याआधीच्या सामन्यांत सचिनला धावांसाठी झुंजावे लागले होते. त्यामुळे त्याने सिडनीतील सामन्यात कव्हर ड्राईव्हचा फटका न मारण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पुढे चेंडू टाकत सचिनला कव्हर ड्राईव्ह मारण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते अपयशी झाले आणि सचिनने द्विशतक झळकावले.

First Published on: April 5, 2020 4:44 AM
Exit mobile version