माझ्याऐवजी इशानला संधी मिळणे योग्यच- आदित्य तरे

माझ्याऐवजी इशानला संधी मिळणे योग्यच- आदित्य तरे

मुंबई यष्टिरक्षक आदित्य तरे

आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच सुमार राहिली आहे. प्रत्येक सामना मुंबईसाठी ‘करो या मरो’ची स्थिती निर्माण करणारा ठरतोय. मुंबईच्या संघाला राजस्थानकडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांचा ‘प्ले ऑफ’चा मार्ग अधिक खडतर झाला होता. मात्र बुधवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेला सामना मुंबईने जिंकला आणि आयपीएलमध्ये कायम राहण्याच्या मुंबईकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

लिलावाच्या वेळी खरेदी केलेला मुंबईकर यष्टीरक्षक आदित्य तरे यालाही मुंबईच्या विजयाची आणि प्ले ऑफमध्ये पात्र ठरण्याची आशा आहे. मात्र, आदित्यला मुंबईकडून अद्याप यंदाच्या हंगामात एकही सामना खेळता आलेला नाही. संघ व्यवस्थापनाने त्याच्याऐवजी झारखंडच्या इशान किशनला संधी दिली आहे. आदित्य तरेचे मात्र यावर वेगळे मत आहे. आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये इशान किशनने केलेली कामगिरी पाहता त्याची झालेली निवड योग्यच असल्याचे आदित्य तरेने म्हटले आहे.

इशान किशन

रणजी चषक विजेता कर्णधार आदित्य तरेने इशानचे कौतुक करताना म्हटले की, “किशन हा एक १९ वर्षांचा युवा खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये त्याला गती असून त्याची प्रतिभा वाखाणण्याजोगी आहे. म्हणूनच मुंबईचे संघ व्यवस्थापन किशनला प्राधान्य देत आहे. ही त्याच्या कारकिर्दीची सुरुवात असून मुंबईकडून आयपीएलमध्ये खेळणे ही त्याच्यासाठी सुवर्णसंधी आहे. यंदाच्या हंगामात त्याने काही सामने मुंबईला एकहाती जिंकवून दिले आहेत. यष्टीरक्षक म्हणूनही त्याने उत्तम कामगिरी केली आहे. मुंबईतर्फे हंगामातील सर्व सामने खेळल्याचा अनुभव त्याला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत नक्कीच उपयोगी ठरेल.”

संघाबाहेर बसण्याबाबत आदित्य म्हणाला, “आयपीएलमधील माझा हा नववा हंगाम आहे. मी या काळात अनेकदा संघाबाहेर बसलोय. त्यामुळे मला या गोष्टी कशा पद्धतीने हाताळायच्या, त्याचा अंदाज आहे.”

First Published on: May 17, 2018 6:02 AM
Exit mobile version