अवघ्या दोन-चार सामन्यांनंतर बुमराहबाबत प्रश्न कशासाठी?

अवघ्या दोन-चार सामन्यांनंतर बुमराहबाबत प्रश्न कशासाठी?

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र, त्याला मागील काही सामन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर दुखापतीमुळे त्याला चार महिने मैदानाबाहेर राहावे लागले होते. त्यानंतर पुनरागमन केल्यापासून बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन असे एकूण सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याला केवळ १ विकेट मिळवता आली आहे. त्यामुळे त्याच्या फॉर्मबाबत लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. ही गोष्ट त्याचा भारतीय संघातील सहकारी मोहम्मद शमीला फारशी आवडलेली नाही.

दोन-चार सामन्यांत चांगली कामगिरी करता आली नाही, म्हणून लोक बुमराहबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याला जर बराच काळ विकेट मिळत नसत्या आणि त्यानंतर चर्चा झाली असती, तर मी समजू शकत होतो. मात्र, अवघ्या दोन सामन्यांनंतर तुम्ही त्याच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित करू शकत नाही. बुमराहने आतापर्यंत भारतीय संघाच्या यशात जे योगदान दिले आहे, ते तुम्ही विसरलात का? तुम्ही त्याकडे कसे दुर्लक्ष करू शकता? बाहेर बसून एखाद्या खेळाडूवर टीका करणे सोपे असते. प्रत्येक खेळाडूला दुखापत होते. त्यानंतर पुनरागमन करणे सोपे नसते. त्यामुळे लोकांनी नकारात्मक गोष्टी बोलणे टाळले पाहिजे, असे शमी म्हणाला.

सैनीला पाठिंबा देणे गरजेचे!

युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी भारतीय संघात पदार्पण केल्यापासून आपल्या वेगाने सर्वांना प्रभावित केले आहे. तो भविष्यात दमदार कामगिरी करेल याची शमीला खात्री आहे. तो म्हणाला, सैनीमध्ये खूप प्रतिभा आहे. तसेच तो चांगल्या वेगाने गोलंदाजी करतो. मात्र, तो युवा असल्याने त्याला पाठिंबा देत राहणे गरजेचे आहे. तो चांगली गोलंदाजी करत आहे, पण त्याच्याकडे अजून फारसा अनुभव नाही. त्यामुळे सिनियर खेळाडू म्हणून आम्ही त्याची मदत केली पाहिजे, असे शमीने सांगितले.

First Published on: February 16, 2020 5:31 AM
Exit mobile version