मागील कामगिरीचा विचार नाही!

मागील कामगिरीचा विचार नाही!

अजिंक्य रहाणेचे उद्गार

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर काही दिवसांपूर्वीच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी धावा करण्यासाठी दबाव होता. त्याला या मालिकेआधी तब्बल दोन वर्षे शतक झळकावता आले नव्हते. मात्र, या दौर्‍यात त्याने टीकाकारांची तोंडे बंद केली. त्याने २ सामन्यांच्या ४ डावांत ९० च्या सरासरीने २७१ धावा काढल्या. परंतु, आता विंडीजमधील दमदार प्रदर्शन त्याला विसरायचे आहे. बुधवारपासून सुरू होणार्‍या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्याचे रहाणेचे लक्ष्य आहे.

मला भूतकाळाचा किंवा भविष्याचा विचार करायला आवडत नाही. मला वर्तमानात रहायला आवडते. मी वेस्ट इंडिजमध्ये तेच केले होते. त्या मालिकेआधी बर्‍याच गोष्टी घडल्या होत्या. माझ्याविषयी चर्चा सुरू होती. मात्र, मी त्याचा विचार न करता, केवळ वर्तमानात जगत होतो. मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. त्यामुळे स्वतःवर कमीतकमी दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. मी वेस्ट इंडिजमध्ये जी कामगिरी केली, तो भूतकाळ आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मला पुन्हा नवी सुरुवात करायची आहे, असे रहाणेने सोमवारी सांगितले.

तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेविषयी रहाणे म्हणाला, तो भूतकाळ आहे. वैयक्तिकदृष्ठ्या ती माझ्यासाठी महत्त्वाची मालिका होती, पण प्रत्येक मालिकेत तुमच्यापुढे नवीन आव्हाने असतात. तुमच्यासमोर परदेशात खेळताना जी आव्हाने असतात, त्यापेक्षा वेगळी आव्हाने भारतात खेळताना असतात. फॉर्म कायम राखणे ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे.

प्रतिस्पर्धी संघाचा आदर करणे महत्त्वाचे!

भारतात मालिका होणार असली तरी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करणे सोपे नसेल, असे अजिंक्य रहाणेला वाटते. आमच्यासाठी सामने आणि मालिका जिंकणे आवश्यक आहे, कारण कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत गुण मिळवणे सोपे नाही. आम्ही एखाद्या संघाविरुद्ध सामने जिंकणारच असे गृहीत धरून चालणार नाही. प्रतिस्पर्धी संघाचा आदर करणे महत्त्वाचे आहे. टेंबा बवूमा आणि इतर काही फलंदाजांनी सराव सामन्यात चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्यांचा आदर करणे, पण स्वतःचा नैसर्गिक खेळ करणे, आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे रहाणे म्हणाला.

First Published on: October 1, 2019 5:22 AM
Exit mobile version