IND vs AUS : कर्णधार रहाणेचा संयम पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना ठरला फायदेशीर!

IND vs AUS : कर्णधार रहाणेचा संयम पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना ठरला फायदेशीर!

अजिंक्य रहाणे आणि रवी शास्त्री 

अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली हे कर्णधार म्हणून भिन्न आहेत. कोहली हा कर्णधार म्हणून आक्रमक असून आपल्या भावना व्यक्त करण्यास घाबरत नाही. दुसरीकडे रहाणे हा संयमी कर्णधार असून आपल्या भावना चेहऱ्यावर येऊ देत नाही. मात्र, असे असले तरी रहाणेमध्ये आक्रमकतेची कमी नसून तो चपळ कर्णधार आहे, अशी स्तुती भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली. तसेच रहाणेच्या संयमी व्यक्तिमत्वाचा फायदा शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या कसोटीत पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना झाल्याचेही शास्त्री म्हणाले.

अजिंक्य चपळ कर्णधार आहे आणि त्याला सामन्याची परिस्थिती चांगल्याप्रकारे कळते. त्याच्या संयमी व्यक्तिमत्वाचा फायदा पदार्पण खेळाडूंना, तसेच गोलंदाजांना झाला. उमेश यादव दुसऱ्या डावात दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. मात्र, अजिंक्यने संयम राखल्याने इतर गोलंदाजांवर दडपण आले नाही, असे शास्त्री म्हणाले. तसेच अजिंक्य आणि विराट यांच्यात कर्णधार म्हणून किती भिन्नता आहे असे विचारले असता शास्त्री यांनी सांगितले, विराट त्याच्या भावना व्यक्त करतो, तर अजिंक्य खूप शांत आणि संयमी आहे. या दोघांच्या व्यक्तिमत्वात खूप फरक आहे. विराट प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी हुज्जत घालण्यासही तयार असतो. अजिंक्य मात्र शांत राहतो. परंतु, त्याच्यात आक्रमकतेची कमी नाही.

 

First Published on: December 29, 2020 8:38 PM
Exit mobile version