अंबाती रायडूने घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

अंबाती रायडूने घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

अंबाती रायुडू

आयपीएलमध्ये चमकलेला आणि नंतर भारतीय क्रिकेट संघात आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष खेचून घेणाऱ्या अंबाती रायुडूने अचानक प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (एचसीए) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषक आणि विंडीज दौऱ्याच्या वन डे सामन्यात रायुडूने चांगल्या धावा केल्या होत्या. पुढल्या वर्षी इंग्लड येथे होत असलेल्या विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ही निवृत्ती घेतली असल्याची माहिती मिळत आहे.

यापुढे रायुडू मर्यादित षटकाच्या क्रिकेटकडे लक्ष देणार आहे. वन डे आमि टिट्वेंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता यावी, यासाठी त्याने एक पेक्षा जास्त दिवसांच्या म्हणजेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीत तो खेळणार नाही, हे जाहीर झाले आहे. मात्र हैदराबाद क्रिकेट असोसिएशनतर्फे वन डे आणि टि ट्वेंटी सामन्यातून तो खेळणार असल्याचे असोसिएशनने रायुडूतर्फे सांगितले आहे.

एचसीएने याबाबत एक पत्रक जाहीर केले आहे. त्यात म्हटले आहे की, “हैदराबाद संघाचा कॅप्टन आणि भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य अंबाती रायुडूने कसोटी क्रिकेट, रणजी ट्रॉफीमधून (एकापेक्षा जास्त दिवसांची) निवृत्ती स्वीकारली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर यापुढे तो लक्ष केंद्रीत करणार आहे. तो आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमध्ये वन डे आणि टि ट्वेंटी क्रिकेट यापुढे खेळेल. तसेच त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), एचसीए, आंध्र क्रिकेट असोसिएशन, बडोदा क्रिकेट असोसिएशन आणि विदर्भ क्रिकेटचे आभार व्यक्त केले आहेत.”

अंबाती रायुडू इंडियन प्रिमीयर लिगमधून खेळत असताना त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सद्या तो चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधीत्व करत आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याची क्षमता ओळखून त्याला वरच्या नंबरवर बॅटिंगसाठी पाठवायला सुरुवात केली. अंबाती रायुडूनेही तीन आणि चार नंबरवर बॅटिंग करताना अनेकवेळा चांगला खेळ केलेला आहे. यावर्षीच्या आयपीएल सीझनमध्ये अंबाती रायुडूने चेन्नईकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या.

First Published on: November 4, 2018 5:39 PM
Exit mobile version